हलगा-मच्छे बायपासचे काम पावसाने बंद पाडविले
बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला पुन्हा सुरुवात केली. पहिल्या दिवशी शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. मात्र त्यानंतर कंत्राटदाराने काम सुरूच ठेवले. गुरुवारी झालेल्या दमदार पावसामुळे कंत्राटदाराला हे काम बंद करावे लागले आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर आणखी काही दिवस हे काम बंद ठेवावे लागणार आहे. हलगा-मच्छे बायपास रस्ता करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गा प्राधिकरणाने गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न केले. तिबार पीक जमिनीतून हा रस्ता केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा या रस्त्याला तीव्र विरोध आहे.
रस्त्यावरील लढाईबरोबरच न्यायालयीन लढाई या शेतकऱ्यांनी लढली आहे. तरी देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा रस्ता करण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न केले आहेत. आताही उच्च न्यायालयामध्ये शेतकऱ्यांचा एक अर्ज प्रलंबित आहे. तरीदेखील हा रस्ता केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त करण्यात आला आहे. चार दिवसापूर्वी हा रस्ता करण्यासाठी कंत्राटदाराने यंत्रसामग्री दाखल केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात केली. त्यावेळी शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे एक दिवस काम बंद ठेवण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवसापासून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. आता जोरदार पावसामुळे काम करणे अवघड झाले आहे. परिणामी हे काम बंद ठेवले आहे. रस्ता करण्यात येत असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून आहे.