गुप्त आलमारीचे आश्चर्य
‘खाकेत कळसा आणि गावाला वळसा’ ही म्हण आपल्याला परिचित आहे. असाच अनुभव अमेरिकेतील एका कुटुंबाला आला आहे. या कुटुंबाने तो सोशल मिडियावर प्रसिद्ध केला आहे. हे कुटुंब एका घरात 30 वर्षे वास्तव्य करीत होते. हे घर या कुटुंबाने अन्य व्यक्तीकडून विकत घेतले होते. या घरात एक तळघर आहे आणि या तळघरात एक गुप्त अलमारी आहे, याचा या कुटुंबाला 20 वर्षांच्या वास्तव्यानंतरही पत्ता लागला नव्हता. तथापि, अचानक या कुटुंबातील काही व्यक्तींना आपल्या घरात तळघर असल्याचा शोध लागला आणि त्यांनी तळघराची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. तपासणी करत असताना त्यांना तेथे एक गुप्त अलमारी किंवा लोखंडी कपाट आढळून आले. त्यामुळे त्यांची उत्सुकता वाढली. या अलमारीत गुप्तधनाचा साठा आहे, की काय अशी एक सुखद शंकाही या कुटुंबातील काही जणांच्या मनात डोकावून गेली. अलमारी उघडण्यात आली.
या अलमारीत धनाचा साठा मिळेल अशी आशा होती. तथापि, अलमारीत जे मिळाले ते स्तिमित करणारे होते. या कपाटात काही खासगी कागदपत्रे, दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर जपानने केलल्या हल्ल्यानंतर प्रसिद्ध झालेले एक वृत्तपत्र, काही छायाचित्रे आणि हाताने रेखाटलेले एक व्यंगचित्र असा ऐतिहासिक ठेवा मिळाला. धनाची प्राप्ती होईल ही आशा फोल ठरली असली तरी जे मिळले होते, त्याचे ऐतिहासिक मूल्य मोठे होते. मिळालेली खासगी कागदपत्रे, छायाचित्रे आणि इतर वस्तू कोणाच्या आहेत, याचा शोध घेण्याचा या कुटुंबाने शोध घेतला. त्यासाठी ही माहिती सोशल मिडियावर टाकण्यात आली आहे. या वस्तूंचे मूळ मालक या कुटुंबाला गवसले आणि या वस्तू मूळ मालकांसाठी महत्वाच्या असतील तर या कुटुंबाला काही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, आता या कुटुंबाने तशी अपेक्षा सोडून दिली आहे.