हायकिंगदरम्यान महिलेला मिळाला खजिना
2000 पेक्षा अधिक प्राचीन नाणी प्राप्त
चेक प्रजासत्ताकमध्ये एका महिलेला हायकिंगसाठी जात असताना खजिना हाती लागला आहे. हा खजिना जमिनीत गाडलेल्या स्थितीत होता. राजधानी प्रागपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावरील कुटना होरा शहरात महिलेला जमिनीत गाडलेल्या अवस्थेत मध्ययुगीन 2 हजार चांदीची नाणी प्राप्त झाली आहेत.
या नाण्यांना एका मातीच्या भांड्यात ठेवून जमिनीत गाडण्यात आले होते, परंतु याचा खालील हिस्साच शिल्लक राहिला आहे. ही रोमन साम्राज्याच्या काळातील चांदीची नाणी असून त्यांना डेनेरियस म्हटले जायचे अशी माहिती चेक अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या पुरातत्व संस्थेने सांगितले आहे.
ही नाणी बहुधा प्रागच्या एका टंकसाळीत तयार करण्यात आली होती. तसेच त्यांच्याकरता बाहेरून चांदी मागविण्यात आली असावी. त्या काळात या भागाला बोहेमिया म्हटले जात होते. मध्ययुगीन चांदीच्या नाण्यांमध्ये थोड्या प्रमाणात तांबे, शिसे आणि अन्य धातूंचा वापर केला जायचा. नाण्यांच्या संरचनेद्वारे चांदीच्या उत्पत्तीचा शोध घेतला जाऊ शकतो असे चेक म्युझियम ऑफ सिल्वरचे संचालक लेंका माजाकोवा यांनी सांगितले.
या नाण्यांना एखाद्या संकटकाळात लपविण्यात आले असावे, हा प्रकार एखाद्या राजकीय उलथापालथीचा संकेत देतो असे पुरातत्व तज्ञांचे मानणे आहे. हा खजिना 12 व्या शतकाच्या पहिल्या तिमाहीत ठेवण्यात आला असावा, तेव्हा राजकीय अस्थिरता होती. त्या काळात देशात प्रागमध्ये राजसिंहानावरून वाद सुरू होता अशी माहिती फिलिप वेलीम्स्की यांनी दिली.
संबंधित ठिकाणी शोध घेण्यात आला असता तेथे 2150 पेक्षा अधिक चांदीची नाणी सापडली आहेत. परंतु या नाण्यांचे मुल्य त्या काळात किती होते यावर तज्ञांमध्ये एकमत झालेले नाही, परंतु ही अत्यंत मोठी रक्कम असावी यावर ते सहमत आहेत. ही एक अत्यंत मोठी, कल्पनेपेक्षा मोठी रक्कम राहिली असावी, सर्वसामान्य व्यक्तीकडे इतकी रक्कम निश्चित नसावी. आजच्या काळात 10 लाख डॉलर्सचा जॅकपॉट जिंकण्यासारखे हे असल्याचे वेलीम्स्की यांनी सांगितले.