नेत्यान्याहूंना फाशी द्या : इराण
वृत्तसंस्था / तेहरान
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना केवळ अटक करुन उपयोग नसून त्यांना सरळ फासावरच लटकविले पाहिजे, अशी दर्पोक्ती इराणचे नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी केली आहे. नेतान्याहू यांच्या विरोधात आंतराष्ट्रीय न्यायालयाने अटक वॉरंट लागू केले आहे. त्या संदर्भात ते प्रतिक्रिया व्यक्त करीत होते.
नेतान्याहू यांनी मानवतेविरोधात गुन्हे केले आहेत. त्यांनी अनेक पॅलेस्टाईनी आणि लेबेनॉनी नागरीकांचा बळी घेतला आहे. त्यांना अटक करुन काहीही साध्य होणार नाही. त्यांना सरळ मृत्यूदंडच दिला पाहिजे असे आवाहन त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाला केले आहे. तथापि, त्यांच्या आवाहनाचा कोणताही परिणाम होणार नाही. कारण, आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्वत:ची प्रक्रिया असते. तसेच हे न्यायालय कोणालाही अभियोग चालविल्याशिवाय शिक्षा देऊ शकत नाही. तसेच या न्यायालयाला अटक वॉरंट काढण्याचा अधिकार असला तरी ज्या देशाच्या व्यक्तीविरोधात ते काढले जाते, त्या देशाच्या प्रशासनावर या वॉरंटप्रमाणे कार्यवाही करण्याची सक्ती हे न्यायालय करु शकत नाही. त्यामुळे इराणच्या नेत्यांचे आवाहन वाया जाणार, असे आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मत आहे. त्यामुळे इराणच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.