सुएज कालव्याची रुंदी वाढतेय
दूर होत आहेत दोन खंड, वैज्ञानिकांचा नवा खुलासा
पृथ्वीचा पृष्ठभाग सातत्याने बदलत असतो. कधीकधी हा बदल अत्यंत मंद असतो, परंतु तो अत्यंत मोठा प्रभाव पाडणारा असतो. अलिकडेच वैज्ञानिकांनी एक चकित करणारा शोध लावला आहे. सुएजचा उपसागर आफ्रिका आणि आशिया खंडांना वेगळा करतो. आता हा उपसागर हळूहळू अधिक रुंद होत आहे. ही प्रक्रिया 50 लाख वर्षांपूर्वी थांबली होती, असे वैज्ञानिकांचे मानणे होते, परंतु आता असे नसल्याचे समोर आले आहे.
सुएजचा उपसागर लाल सागराचा उत्तरेकडील हिस्सा आहे. हा इजिप्तमध्ये असून सुएज कालवा याच्याशीच जोडलेला आहे. जवळपास 2.8 कोटी वर्षांपूर्वी अरब टेक्टॉनिक प्लेट आफ्रिकन प्लेटपासून वेगळी होण्यास सुरुवात झाली होती. यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तुटू लागला आणि आखात निर्माण झाले. अशा तुटणाऱ्या जागांना रिफ्ट म्हटले जाते. रिफ्टमुळे नवे महासागर निर्माण होतात. उदाहरणार्थ लाल सागर अजूनही रुंद होत नवा महासागर निर्माण होतोय. परंतु सुएजच्या उपसागराविषयी 50 लाख वर्षांपूर्वी हा रिफ्ट थांबला होता असे मानणे होते. याचमुळे हे केवळ एक उपसागर बनून राहिले, महासागर झाले नाही. याला फेल्ड रिफ्ट म्हटले जात होते.
नवे संशोधन
जियोफिजिकल रिसर्च लेटर्स या नियतकालिकात एक नवे संशोधन प्रकाशित झाले. सुएजचे रिफ्ट कधीच पूर्णपणे थांबले नाही. हे केवळ अत्यंत मंद होत गेले. अद्याप देखील हे दरवर्षी सुमारे 0.5 मिलिमीटर रुंद होत असल्याचे वैज्ञानिकांनी यात म्हटले आहे. हे प्रमाण कमी वाटत असले तरीही लाखो वर्षांमध्ये हे मोठा बदल घडवून आणू शकते. संशोधनाचे मुख्य लेखक डेव्हिड फर्नांडेज-ब्लँको आहेत. ते चीनच्या चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये काम करतात. रिफ्टची कहणी केवळ दोन प्रकारची नसते असे आमचे संशोधन सांगतो. एक तर यशस्वी (नवा महासागर निर्माण होणे) किंवा पूर्णपणे अयशस्वी (बंद होणे) हेच घडत नाही, मधला मार्ग असून रिफ्ट मंदावू शकते असे त्यांनी सांगितले आहे.
वैज्ञानिकांना कसे कळले?
वैज्ञानिकांनी आखाताच्या 300 किलोमीटर लांब भागाचे अध्ययन केले असता त्यांना या गोष्टी दिसून आल्या...
-उपसागराच्या किनाऱ्यांवर जुनया कोरल रीफ्स समुद्रपातळीच्या वर आल्या आहेत. काही ठिकाणी हे 18-20 मीटर उंच आहेत, जमीन वर येत असल्याने हे घडत आहे.
-नद्यांचे मार्ग आणि पर्वतांचे आकार असे आहेत, जे केवळ घर्षणामुळे निर्माण होत नाहीत, हे टेक्टॉनिक हालचालींमुळे निर्माण होत आहेत.
-या भागात छोटे-छोटे भूकंप होत असतात.
-जमिनीत फॉल्ट्स अद्यापही सक्रीय आहेत.
-हे सर्व संकेत रिफ्ट अद्यापही जारी असल्याचे सांगतात.
का मंद झाले, परंतु थांबले नाही?
50 लाख वर्षांपूर्वी प्लेट्सची दिशा बदलली, आफ्रिका आणि अरब प्लेट्सदरम्यान नवी सीमा डेड सीनजीक निर्माण होऊ लागली. यामुळे सुएजच्या उपसागरातील ताण कमी झाला, परंतु पूर्णपणे बंद झाला नाही. हे अमेरिकेच्या पश्चिम हिस्स्याप्रमाणे हळूहळू फैलावत आहे जेथे पर्वत आणि दऱ्या निर्माण होत आहेत.
या शोधाचा अर्थ काय?
-भूकंपाचा धोका अधिक : हा भाग शांत असल्याचे पूर्वी मानले जात होते, परंतु येथे मोठे भूकंप होण्याची शक्यता अधिक असल्याचे कळले आहे. लोक आणि इमारतींसाठी खबरदारी बाळगावी लागेल.
जगातील अन्य रिफ्ट्सवर नजर : जगात अनेक अयशस्वी रिफ्ट्स आहेत, आता वैज्ञानिक ते हळूहळू सक्रीय तर नाहीत ना याची पुन्हा तपासणी करतील.
पृथ्वीबद्दल अधिक माहिती : पृथ्वीच्या प्लेट्सबद्दल अधिक माहिती मिळेल. डेविड फर्नांडेज-ब्लँको यांनी पृथ्वीच्या टेक्टॉनिक सिस्टीम आमच्या विचारापेक्षा अधिक गतीशील आणि सातत्याने चालणारी असल्याचे सांगितले आहे. हा शोध आमची पृथ्वी जिवंत असल्याची आठवण करून देतो. पृथ्वी बदलत राहते, कधी वेगाने, कधी अत्यंत मंदपणे, परंतु थांबत नाही असे ब्लँको यांनी म्हटले आहे.