पूर्ण जग ‘संकट काळात’ प्रवेश करतेय : जपान संरक्षण मंत्रालय
वृत्तसंस्था/ टोकियो
दक्षिण चीन समुद्रात सुरू असलेल्या तणावादरम्यान जपानच्या संरक्षण मंत्रालयाने जगाला मोठा इशारा दिला आहे. पूर्ण जग ‘संकटांच्या नव्या काळात’ प्रवेश करत आहे. याकरता केवळ चीन नव्हे तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील जबाबदार आहेत असे जपानच्या वार्षिक संरक्षण धोरणपत्रात म्हटले गेले.
ट्रम्प यांच्या धोरणांचा हिंद-प्रशांत क्षेत्रात अत्यंत मोठा प्रभाव पडणार असल्याचे जपानच्या धोरणपत्रात नमूद आहे. तसेच चीनच्या ग्रे झोन वॉरफेयरवरून यात गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. याचबरोबर भारत आणि जपानदरम्यान हिंद-प्रशांत क्षेत्रात संरक्षण सहकार्य वाढविण्यात यावे अशी सूचना करण्यात आली आहे.
जपानच्या संरक्षण अहवालानुसार चीन हा जपानसाठी सर्वात मोठे रणनीतिक आव्हान ठरला आहे. जग संकटांच्या नव्या काळात प्रवेश करत आहे. हिंद-प्रशांतचा मुद्दा आगामी काळात अधिक गंभीर होणार असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे. अहवालानुसार चीन जपानसाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे आव्हान ठरला असून जगात शक्तिसंतुलन वेगाने बदलत आहे.