ऑस्ट्रेलियातील पराभवापेक्षा मायदेशातील ‘व्हाईटवॉश’ हे मोठे अपयश : युवराज सिंग
रोहित शर्मा व विराट कोहलीवर टीका करणे गैर असल्याचे मत
वृत्तसंस्था/ दुबई
विश्वचषक विजेत्या संघातील माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने न्यूझीलंडकडून घरच्या मैदानावर व्हाईटवॉश होणे ही टीम इंडियासाठी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावण्यापेक्षा मोठी नीचांकी कामगिरी होती, असे म्हटले असून रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज खेळाडूंविऊद्ध सध्या होणाऱ्या टीकेच्या सुरात सूर मिसळविण्यास त्याने नकार दिला आहे.
भारताची गेल्या काही महिन्यांत कसोटींमध्ये घसरण झालेली असून घरच्या मैदानावर न्यूझीलंडविऊद्ध त्यांना 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला, जो संघाच्या कसोटी इतिहासातील पहिलाच अशा प्रकारचा दारुण पराभव होता. यानंतर बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-3 असा पराभव केला. दोन्ही पराभवांना मुख्यत्वे संघाची कमजोर फलंदाजी, विशेषत: रोहित आणि कोहली कारणीभूत ठरले आहेत.
माझ्या मते न्यूझीलंडकडून हरणे जास्त दुखावून जाणारे आहे कारण त्यांना मायदेशी 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला, ते स्वीकारता येण्याजागे नाही. ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावसकर चषक मालिकेत हरणे तरी स्वीकारता येईल. कारण भारताची दोन वेळा ऑस्ट्रेलियात सरशी झालेली आहे आणि यावेळी ते हरले, गेल्या अनेक वर्षांपासून ऑस्ट्रेलियाचा दबदबा राहिला आहे. हा माझा विचार आहे, असे भारताच्या 2011 मधील विश्वचषक विजयाचा नायक राहिलेल्या 43 वर्षीय युवराज सिंगने म्हटले आहे.
कोहलीने या मालिकेदरम्यान किमान एक शतक झळकावलेले असले, तरी जेव्हा जेव्हा त्याला ऑफ स्टंपबाहेर खेळण्याचे आमिष दाखविले गेले तेव्हा तेव्हा त्यास बळी पडून तो बाद झाला तर रोहितने केवळ 31 धावा जमविल्या आणि त्याला अंतिम कसोटीतून बाहेर पडावे लागले. पण युवराजच्या मते, या दोघांची भूतकाळातील कामगिरी पाहता त्यांच्यावर टीका करणे अयोग्य आहे.
आम्ही आमच्या विराट कोहली आणि रोहित शर्मा या महान खेळाडूंबद्दल बोलत आहोत, आम्ही त्यांच्याबद्दल खूप वाईट बोलत आहोत. त्यांनी भूतकाळात काय काय साध्य केले ते लोक विसरतात. ते या काळातील महान क्रिकेटपटूंपैकी एक आहेत. ठीक आहे, ते हरले, ते चांगले क्रिकेट खेळले नाहीत. हे त्यांच्या मनाला आमच्यापेक्षा जास्त बोचत असेल, असे तो पुढे म्हणाला.
भारत जोरदार पुनरागमन करेल अशी आशा व्यक्त करताना युवराज म्हणाला की, मला फक्त रोहित आणि कोहलीच नव्हे, तर नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर देखील पूर्ण विश्वास आहे. गंभीर हा युवराजचा संघातील सहकारी राहिला होता. ‘मला वाटते की, प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर, निवड समिती अध्यक्ष म्हणून अजित आगरकर तसेच रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह या सध्याच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम व्यक्ती आहेत. भारतीय क्रिकेटचा भविष्यातील मार्ग त्यांनी ठरवायचा आहे, असे मत त्याने व्यक्त केले. सिडनी कसोटीतून माघार घेतल्याबद्दल रोहित शर्माचे कौतुक करताना, संघहित लक्षात घेऊन केलेली ती एक नि:स्वार्थ कृती होती, असे युवराजने सांगितले.