बहुमजली कार पार्किंगचे भिजत घोंगडे कायम
भूमिपूजन करून वर्ष उलटले : अद्याप काम सुरू नाहीच
►प्रतिनिधी / बेळगाव
शहरात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर नियंत्रण व पर्याय ठेवण्याच्या उद्देशाने बापट गल्लीत बहुमजली कार पार्किंग उभारण्यासाठी वर्षभरापूर्वी भूमिपूजन करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलेले नसल्याने बहुमजली इमारतीचे भिजत घोंगडे पडले आहे. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
बापट गल्लीतील बहुमजली कार पार्किंग प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी स्मार्ट सिटीकडून निविदा मागवण्यात आली होती. त्यावेळी बेंगळूर येथील बीव्हीजी इंडिया या एजन्सीला ठेका देण्यात आला होता. एजन्सीला ठेका देण्यात आल्यानंतर कंपनीने सहा महिने प्रतिसाद दिला नाही. या प्रकल्पाचे दोन वषृ काम पूर्ण करायचे होते. मात्र, ठेका मिळवल्यानंतर काम सुरू करण्यास सहा महिने विलंब करणाऱ्या एजन्सीला अधिकाऱ्यानी सातवेळा नोटीस बजावली. मात्र, याचा काही उपयोग झाला नाही. तसेच महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव देखील या प्रकल्पाच्या विलंबास कारणीभूत ठरला.
बहुमजली पार्किंग इमारत उभारण्यासाठी एजन्सीद्वारे महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीकडून सर्वसमावेशक योजना अहवाल (डीपीआर) सादर करायचा आहे. हा डीपीआर एजन्सी सादर करणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. स्मार्ट सिटीकडून जमीन मंजुरीसाठी पत्रकारव्यवहार करण्यात आला आहे. भूमापन विभागाकडे जमिनीचे क्षेत्र निश्चित करण्याचे काम बाकी आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बहुमजली पार्किंग सुरू होईल, अशी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 20 गुंठे जागेत तीन मजली इमारत उभारण्यात येणार असून यामध्ये अंदाजे 140 हून अधिक कार पार्किंग करण्यासाठी जागा उपलब्ध असेल.
सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) योजनेतून बहुमजली कार पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नऊ कोटी ऊपयांचा हा प्रकल्प आहे. प्रकल्पाचे बांधकाम सुरू केल्यानंतर स्मार्ट सिटीकडून आपल्या हिस्याचे दोन कोटी ऊपये देणार आहे. तर उर्वरित सात कोटी ऊपये एजन्सीने घालून योजना राबवावी लागणार आहे.
| भूमापन विभागाकडून जागेची हद्द निश्चित करणे बाकी बहुमजली कार पार्किंग इमारत उभाण्यासाठी भूमापन विभागाकडून जागेची हद्द निश्चित करणे बाकी आहे. यासाठी स्मार्ट सिटी कडून पत्रव्यवहार करण्यात आला आहे. -सय्यदा अफ्रीन बानुबेळ्ळारी, व्यवस्थापकीय संचालिका, स्मार्ट सिटी |