For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गरीबांचे कल्याण हेच माझे प्रथम ध्येय!

07:00 AM May 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
गरीबांचे कल्याण हेच माझे प्रथम ध्येय
Advertisement

‘देशातील गोरगरीबांचे कल्याण हीच माझ्या सरकारची आणि माझी प्राथमिकता आहे. वाराणसीत जन्मलेले थोर संत गुरु रविदास यांच्या महान कार्यापासून प्रेरणा घेऊन मी माझे हे ध्येय निर्धारित पेले आहे. त्यामुळे गेल्या 10 वर्षांमध्ये देशाचा अभूतपूर्व विकास झाला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते पंजाबमधील होशियारपूर येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रचार सभेत भाषण करीत होते. पंजाबमधील आदमपूर येथील विमानतळाला संत रविदास यांचे नाव देण्यात यावे, ही इच्छा त्यांनी या विशाल जनसभेत व्यक्त केली आहे. या लोकसभा निवडणुकीतील ही माझी अंतिम प्रचारसभा आहे. या सभेसाठी मी होशियारपूरची निवड हेतुपुरस्सर केली आहे. ही भूमी संत रविदास यांची आहे. संत रविदास यांचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला. मी वाराणसीचाच लोकप्रनितिधी आहे. होशियारपूरला ‘छोटी काशी’ असेच म्हणतात. ही गुरु रविदास यांची तपोभूमी आहे. अशा प्रकारे वाराणसी आणि होशियारपूर यांचा अन्योन्य संबंध संत गुरु रविदास यांच्यामुळे आहे. म्हणूनच या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता करण्यासाठी होशियारपूरची निवड केली. येथे प्रचाराची सांगता करणे हे माझ्यासाठी परम भाग्याचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी प्रचारसभेत केले.

Advertisement

काँग्रेसवर जोरदार घणाघात

काँग्रेसने भ्रष्टाचार या विषयात ‘डबल पीएचडी’ केली आहे. काँग्रेसला देशाच्या सैन्यदलांसंबंधी कोणतीही सहानुभूती नाही. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचाही पुरावा मागण्याचा उद्धटपणा काँग्रेसने आणि इतर विरोधी पक्षांनी केला आहे. काँग्रेसने उधळपट्टी करुन देशाच्या संपत्तीचा विनाश केला. कोणतीही भरीव कामगिरी या पक्षाने त्याच्या सत्ताकाळात करुन दाखविली नाही. या पक्षाच्या नेत्यांनी स्वत:चा लाभ मात्र करुन घेतला. आमच्या सरकारने आता देशाची अर्थव्यवस्था प्रगतीच्या मार्गावर आणली असून यापुढच्या काळात देश जोमाने विकास करणार आहे. 2047 पर्यंत भारत विकसीत राष्ट्र होणार असून येत्या पाच वर्षातच भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून समोर येणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

Advertisement

आम आदमी पक्षावर टीका

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे. या सरकारने पंजाबमधील उद्योग आणि शेती या दोन्हींचाही घात केला आहे. आम आदमी पक्षाच्या सरकारची नकारात्मक धोरणे पंजाबसाठी धोक्याची आहेत. राज्यात गुन्हेगारी, अंमली पदार्थांचा व्यापार आणि शस्त्रास्त्रांची तस्करी वाढू लागली आहे. राज्य सरकार या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यास असथर्म ठरत आहे, अशी टीका त्यांनी केली.

आमचा विजय निश्चित

या लोकसभा निवडणुकीतही भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मोठा विजय मिळणार आहे. लोकांचा आमच्यावर विश्वास असून हा विश्वास ते पुन्हा एकदा व्यक्त करत आहेत. 4 जूनला मतगणना असून त्या दिवशी या विश्वासाची प्रचीती सर्वांना येईल, अशी शाश्वती त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान मोदी यांचा मार्ग मोकळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघातून निवडणुकीची स्पर्धा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना निवडणुकीत स्पर्धा करण्यास बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जे आरोप याचिकेत करण्यात आले आहेत, ते बेजबाबदार आणि बिनबुडाचे आहेत, अशी कठोर टिप्पणी याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाने केली आहे. ही याचिका कॅप्टन दीपक कुमार याने सादर केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 2018 मध्ये ‘एअर इंडिया’ चे एक विमान पाडण्याचा कट रचला होता. या विमानाचा चालक मी स्वत: होतो, असा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. ही याचिका केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अश्लाघ्य आरोप करण्यासाठीच सादर करण्यात आली आहे, हे याचिकेतील आशयावरुन स्पष्ट होत असल्याने ती फेटळाली जात आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सचिन दत्ता यांनी आपल्या निर्णयपत्रात स्पष्ट केले आहे. याचिकेतील आरोप अत्यंत अस्पष्ट, विस्कळीत आणि पुराव्याविना करण्यात आल्याचे दिसून येते, असेही न्यायाधीशांनी निर्णयपत्रात स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.