या देशांमध्ये मुलांना घराबाहेर झोपविण्याचा प्रकार
बर्फाळ थंडी, उणे तापमानात आईवडिलांकडून कृत्य
कुठलेही आईवडिल स्वत:च्या तान्ह्या मुलाला शून्याच्या खाली उणे तापमानात खुल्या आकाशाखाली झोपण्यासाठी सोडू शकतात का? हा प्रकार अजब वाटत असला तरीही हे सत्य आहे. काही देशांमध्ये आईवडिल स्वत:च्या छोट्या मुलांना बर्फाळ हवामानात घराबाहेर पाळण्यात ठेवून देतात. डेन्मार्क, फिनलंड, नॉर्वे, स्वीडन यासारखे नॉर्डिक देश किंवा स्केंडेनेवियन देशांमध्ये कडाक्याच्या थंडीत घराबाहेर खुल्या आकाशाखाली एकटीच झोपलेली छोटी मुले दिसून येतात. या ठिकाणी सर्वाधिक थंडी असते आणि तरीही आईवडिल स्वत:च्या छोट्या मुलांना घराबाहेर पाळण्यात ठेवतात.
जुनी प्रथा
या देशांमध्ये ही जुनी प्रथा आहे. या थंड हवेत राहिल्याने मुलांना चांगली झोप येत असल्याचा लोकांचा तर्क आहे. फिनलंड आणि डेन्मार्कमध्ये ही प्रथा सामान्य आहे, आईवडिल स्वत:च्या मुलांना तापमान उणे 16 अंशापर्यंत खालावल्यावर झोपवित असतात. नॉर्डिक आईवडिल स्वत:च्या झोपलेल्या बाळाला घराबाहेर सोडून कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये जातात किंवा एखादे काम पूर्ण करू लागतात. डेन्मार्कमध्ये डेकेयर सेंटर्समध्ये बाळांच्या झोपेसाठी बाहेर राखीव क्षेत्रही असते.
नॉर्डिक संस्कृतीत मुलांना जितके शक्य होईल तितका वेळ बाहेर घालविण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. खराब हवामानासारखी कुठलीच गोष्ट नाही, केवळ खराब कपडे असतात, या आशयाची म्हण नॉर्डिक देशांमध्ये आहे. छोटे मूल कुठल्याही वेळी घरातून बाहेर जाऊ शकते, केवळ त्याने योग्य कपडे परिधान केले असणे आवश्यक आहे. डेन्मार्क आणि स्वीडनमध्ये शिक्षक याच धारणेला लागू करतात. तेथील अनेक शाळा फॉरेस्ट स्कूल मॉडेलचे पालन करतात, जे बाहेरील वातावरणाला वर्गाच्या रुपात वापर करण्यास प्रोत्साहन देते.