तिलारी धरणातुन विसर्ग होणाऱ्या पाण्याला तिरंग्याचा साज
' हर घर तिरंगा' अभियान अंतर्गत रोषणाई
साटेली | भेडशी , प्रतिनिधी
'हर घर तिरंगा' अभियान अंतर्गत तिलारी खळग्यातील धरणावर तिरंगा कलर मध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली असून यादरम्यान धरणाच्या पाण्याचा विसर्ग नदीत सोडण्यात येणार असल्याने तिलारी नदीक्षेत्रातील नद्यांची पाणी पातळी वाढू शकते त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी दिला आहे.
तिलारी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने धरणाच्या पाचही दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.सतत सुरू असलेला पाऊस आणि नदीत सोडण्यात येणारा धरणातील पाण्याचा विसर्ग यामुळे पूरस्थिती निर्माण होत आहे.तर 'हर घर तिरंगा' अभियान अंतर्गत तिलारी खळग्यातील धरणावर तिरंगा कलर मध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली असून पुढील तीन दिवस 13 ऑगस्ट पासून 16 ऑगस्ट पर्यंत दररोज सायंकाळी 7.30 ते रात्री 12.00 वाजेपर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे. पाण्याचा विसर्ग अंदाजे 50 क्युमेंक्स असणार आहे. त्यामुळे नदी पात्रात अचानक पाण्यात वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीतील सर्व कॉजवे, पाईप मोरी वरुन पाणी वाहणार आहे. त्यामुळे दिनांक 13. ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या कालावधीत कॉजवे वरुन ये जा करू नये, नदीकाठी जाऊ नये अणि नदीकाठचा गावांना सतर्कता बाळगावी असे आवाहन कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी केले आहे.