नंदगड-हलशी रस्त्याशेजारील नाल्याचे पाणी दूषित
वार्ताहर/हलशी
नंदगड-हलशी रस्त्यावर नंदगड येथील कचरा टाकण्यात येत आहे. या रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये हा कचरा पडत असल्याने तो नाल्यातून वाहत जाऊन कसबा नंदगड, चन्नेवाडी, भुत्तेवाडी, नरसेवाडी यासह इतर गावातील नागरिकांना त्रास होत आहे. या नाल्यात नंदगड येथील धरणाचे पाणी सोडण्यात येते. त्यामुळे या पाण्याचा उपयोग शेतकरी लोक आपल्या जनावरांना आणि शेती कामासाठी करतात. त्यामुळे हा कचरा शेतात वाहून येत असल्याने शेतकऱ्यांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या नाल्याचे पाणी शेतीसाठी तसेच जनावरांना पाजण्यासाठी वापरले जाते.
या कचऱ्यातून प्लास्टिक पिशव्या, बाटल्या तसेच पाण्यात न विरघळणारे साहित्य येत असल्याने जनावरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच शेतीला जाणाऱ्या पाण्यातून प्लास्टिक कचरा जात असल्याने भातपिकाचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. हा प्लास्टिक कचरा नाल्यात जात असल्याने नाल्यामध्ये गाळ साचत आहे. तसेच या कचऱ्याचे अवशेष रस्त्यावर व नाल्यामध्ये येऊन पडत असल्यामुळे गलिच्छ वातावरण निर्माण झाले आहे. तरी नंदगड ग्राम पंचायतीने याकडे लक्ष देऊन कचरा रस्त्याच्या बाजूला न टाकता आपल्या नियोजित जागेवर साठवावा, अशी मागणी नंदगड ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.