शिवबसवनगरमध्ये गँगवाडीतील तरुणावर टोळक्याकडून चाकूहल्ला
वादग्रस्त स्टेटसवरून विद्यार्थ्यावर वार
बेळगाव : गँगवाडी येथील एका तरुणावर चाकूहल्ला करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी शिवबसवनगर परिसरात ही घटना घडली असून या घटनेनंतर हिंदू संघटनांनी हल्लेखोरांवर कारवाई करावी, या मागणीसाठी चन्नम्मा चौकात धरणे धरले. परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. किशन लोंढे (वय 23) रा. गँगवाडी असे त्याचे नाव असून 15 ते 20 जणांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला केला आहे. त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमी किशन हा गँगवाडी येथील जय भीम संघटनेचा नेता असून सोशल मीडियावरील वादग्रस्त स्टेटसमुळे ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती समजताच माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन जखमी किशनकडून या घटनेसंबंधी माहिती घेतली. किशन हा विद्यार्थी असून वादग्रस्त स्टेटसवरून त्याला धमकावण्यात आले होते. प्राचार्यांपर्यंत हा विषय पोहोचला होता. या सर्व घटनांचे पर्यवसान गुरुवारी चाकूहल्ल्यात झाले आहे. या घटनेनंतर हिंदू संघटनांनी निदर्शने केली. विद्यार्थ्यावर चाकूहल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
बेळगावात पोलीस यंत्रणा कुचकामी?
गेल्या पंधरवड्यातील प्रमुख घटना लक्षात घेता बेळगावात पोलीस यंत्रणा कुचकामी ठरत आहे की काय? असा संशय बळावत चालला आहे. कायदा व सुव्यवस्था परिस्थिती ढासळत चालली असून चोऱ्या, घरफोड्या वाढल्या आहेत. मटका, जुगार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यावर नियंत्रण मिळवण्याची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी काही जणांनी गुन्हेगारांशी हातमिळवणी करून गैरधंद्यांना पाठबळ दिल्यामुळेच पोलीस दल कुचकामी ठरत आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी वेळीच आपल्या अखत्यारितील भ्रष्ट व ऐतखाऊ अधिकाऱ्यांवर वचक ठेवला नाही तर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती अधिक आहे. कारण सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांपैकी अनेकांनी सेवेसाठी नव्हे तर वरकमाईसाठी बेळगावात आपली वर्णी लावून घेतलेली आहे