कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कळंबा तलावाची पाणीपातळी 18 फुटांवर

12:30 PM May 30, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

काही दिवसांपासून कोल्हापूर जिह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लागली असून, या पावसाचा सकारात्मक परिणाम कळंबा तलावाच्या जलसाठ्यावर दिसून येत आहे. ऐतिहासिक कळंबा तलावाची पाणीपातळी अवघ्या काही दिवसांत 12 फुटांवरून थेट 18 फूटांवर पोहोचली आहे. कळंबा ग्रामपंचायत आणि कोल्हापूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य आधार असलेल्या या तलावात पावसामुळे जलसाठा झपाट्याने वाढत आहे.

Advertisement

कात्यायनी टेकडीतील सात नैसर्गिक नाल्यांमधून दुतोंडी भरून तलावात जलप्रवाह सुरु झाला आहे. तलावाची एकूण साठवण क्षमता 27 फूट असून, अवकाळी पावसामुळे आलेल्या जोरदार आवकेमुळे तलाव भरू लागला आहे. पावसाचे हेच स्वरूप आणखी काही दिवस कायम राहिल्यास लवकरच तलाव सांडव्यासह वाहण्याची शक्यता आहे.

तलावाच्या वाढलेल्या पाणीपातळीमुळे कळंबा गाव आणि शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी दिलासा मिळाला असला, तरी सध्या तलाव परिसरात कोणतीही सुरक्षा यंत्रणा नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षाच्या दृष्टीने प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. तसेच तलाव परिसरात सुरक्षा रक्षक आणि सूचना फलक तातडीने लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.

2024 मध्ये तलावातील जलसाठा अत्यंत कमी असल्याने जुलै महिन्यात पाणीपातळी केवळ 5 फूटांवर पोहोचली होती. यामुळे कळंबा गावचा आणि शहरातील काहि भागाला पाणी उपसा बंद करून कळंबा गावाला विहीर व बोअरवेल्सवर अवलंबून राहावे लागले होते तर शहराला शिंगणापूर योजनेतून अतिरिक्त भार द्यावा लागला होता. मात्र, जुलैअखेरच्या पावसाने तलाव सांडव्यासह वाहू लागला होता. यंदा मात्र अवकाळी पावसामुळे वेळेआधीच तलाव भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सांडव्यासह पाणी वाहू लागल्यास तलाव परिसर पर्यटनस्थळ बनतो. या ठिकाणी स्थानिक नागरिकांसह पर्यटकही मोठ्या संख्येने गर्दी करतात. त्यामुळे संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे. सुरक्षितता आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने उपाययोजना राबवणे अत्यावश्यक ठरणार आहे.

कळंबा तलावाची पाणीपातळी 18 फूट

साठवण क्षमता 27 फूट

सात नैसर्गिक नाल्यांमधून पाण्याची आवक सुरू

कळंबा तलावात जलसाठा वाढल्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा दिलासा मिळणार आहे. ही समाधानाची बाब असून, लवकरच तलाव सांडव्यासह वाहण्याची शक्यता लक्षात घेता, सुरक्षा रक्षक व सूचना फलक लावणे अत्यंत आवश्यक आहे. महापालिकेने याकडे तातडीने लक्ष द्यावे.

                                                                                                                                                      - सुमन गुरव, सरपंच कळंबा


तलाव भरू लागल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे. मागील वर्षी पाण्याअभावी मोठा त्रास सहन करावा लागला होता. यंदा मात्र अवकाळी पावसामुळे तलाव लवकर भरत याचे समाधान आहे.

                                                                                                                                             - पूनम जाधव, उपसरपंच कळंबा

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article