वाटद एमआयडीसी संघर्ष पोहचला मुंबईत!
रत्नागिरी :
रत्नागिरी जिह्यातील वाटद, मिरवणे, कळझोंडी, गडनरळ, वैद्यलावगण, कोळीसरे या गावांमध्ये प्रस्तावित असलेल्या एमआयडीसी प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. हा प्रकल्प विरोधी संघर्ष आता मुंबईत पोहचला असून शासनाने प्रकल्पाची अधिसूचना रद्द करेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा ठाम निर्धार दादर येथील बैठकीत व्यक्त करण्यात आला. येत्या 8 दिवसात दादर येथे हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत निदर्शने आयोजित केली जाणार आहेत.
या संघर्षाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आणि सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवण्यासाठी नुकतीच मुंबईतील दादर येथे एक महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीत प्रकल्प विरोधी लढ्याची रणनीती निश्चित करण्यात आली. दादर येथील पर्ल सेंटरमध्ये झालेल्या या बैठकीला संघर्ष कृती समितीचे प्रमुख प्रथमेश गोपाळ गावणकर, उपाध्यक्ष संतोष बारगुडे, नंदकिशोर आग्रे, ओमकार शितप यांच्यासह मुंबईस्थित कोकणवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत सर्वानुमते अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
शासनाने प्रकल्पाची अधिसूचना रद्द करेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा ठाम निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. याशिवाय सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत एक भव्य जनसंवाद सभा घेतली जाणार आहे. प्रकल्पग्रस्त गावांच्या भावना आणि मागण्या पोहोचवण्यासाठी संघर्ष समितीचे शिष्टमंडळ लवकरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. शासनाने ग्रामस्थांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मुंबईत बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
हा संघर्ष केवळ स्थानिक गावांपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण कोकणच्या भविष्यासाठी महत्वाचा असल्याचे संघर्ष समितीचे प्रमुख प्रथमेश गावणकर यांनी सांगितले. मुंबईतील बैठकीमुळे या आंदोलनाला आता व्यापक स्वरुप प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- ग्रामस्थांची भूमिका: विकास हवा, पण जबरदस्तीचा नको
आम्हांला विकास नको आहे, असे नाही, पण तो आमच्या अटींवर असायला हवा. आमच्या जमिनी बळकावून जबरदस्तीने प्रकल्प लादण्याऐवजी शेतीपूरक किंवा पर्यटनावर आधारित प्रकल्प आणल्यास आम्ही सरकारला सहकार्य करू, अशी स्पष्ट भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे.