गाथा पारायणातील प्रवचन-कीर्तनाने वारकरी तृप्त
बेळगाव : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन सोहळा अंतर्गत अनगोळ येथील एसकेई स्पोर्ट्स अॅकॅडमीच्या मैदानात मागील सहा दिवसांपासून अखंड तुकोबा गाथा पारायण सुरू आहे. या सोहळ्याला वारकरी भक्तांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी विविध कार्यक्रमांबरोबर प्रवचन आणि सुश्राव्य कीर्तन सोहळाही झाला. शुक्रवारी पहाटे 4.30 ते 6 या वेळेत काकड आरती, 6 ते 7 या वेळेत महाअभिषेक, सकाळी 7 ते 9.30 वा. गाथा पारायण, त्यानंतर सकाळी 10 ते 12.30 पर्यंत गाथा पारायण, दुपारी 12.30 ते 3 भजन, दुपारी 3 ते 4.30 हरिपाठ तर सायंकाळी सांगली येथील हभप संतोष सहस्त्रबुद्धे महाराज यांचे प्रवचन झाले. यामध्ये त्यांनी वारकऱ्यांचे विचार स्पष्ट केले.
या गाथा पारायण सोहळ्यासाठी प्रवचनकार म्हणून स्वामी श्री चितप्रकाशनंदजी सरस्वती, हभप जगन्नाथ महाराज देशमुख, सिद्धगिरी संस्थान मठाचे काडसिद्धेश्वर स्वामीजी, आळंदी येथील हभप श्रीकांत महाराज पातकर, पंढरपूर येथील हभप देवव्रत (राणा) विवेकानंद वास्कर यांची सेवा मिळाली आहे. त्याबरोबर कीर्तनकार म्हणून हभप योगीराज महाराज गोस्वामी, हभप ज्ञानेश्वर महाराज रामदास, हभप गुरुनाथ महाराज हौसेकर, हभप महंत महामंडलेश्वर, हभप जयवंत महाराज बोधले यांनी कीर्तन सेवा केली आहे. या प्रवचन आणि कीर्तन सेवेने परिसरातील वारकरी तृप्त झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी श्रीक्षेत्र नाशिक येथील हभप महामंडलेश्वर रामकृष्णदास महाराज लहवीतकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. यावेळीही वारकरी, नागरिक, महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.