For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रशिया आणि युक्रेन युद्ध अंतिम टप्प्यात

06:14 AM Nov 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
रशिया आणि युक्रेन युद्ध अंतिम टप्प्यात
Advertisement

युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियाला जागतिक राजकीय पटलावर एकटे पाडण्याचे अमेरिकेचे मनसुबे हवेत विरळू लागले. जगातील युद्ध अभ्यासक आता व्हिएतनाम व अफगाणिस्ताननंतर युक्रेन युद्धातही अमेरिकेला शह बसणार असल्याचे भाकीत वर्तवू लागले. युक्रेनचे पूर्व नक्कलसम्राट आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष  वोलोदोमीर झेलेन्स्की यांनी आपल्या देशापाशी आता ना शस्त्र, ना सैनिक आणि ना पैसा शिल्लक राहिलेला असून नाटो देशांनीच या कठिण प्रसंगी दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे पुरवून युक्रेनला सांभाळण्याचे कळकळीचे आवाहन आपल्या तथाकथित पश्चिमी मित्र राष्ट्रांना केले आहे.

Advertisement

वोलोदोमीर झेलेन्स्की यांच्या या जाहीर वक्तव्याने रशियाविरोधात लढणाऱ्या अमेरिकेसारख्या बलाढ्या आघाडीतील हवाच निघाली आहे. दोन महिन्यांपूर्वी रशियाच्या पश्चिमेकडील एका शहरावर युक्रेनचा कब्जा झाल्याची बातमी क्षणात जगभरात पसरली. त्यानंतर सर्वत्र सामसूम पसरल्यानंतर गेल्या आठवड्यात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या निराशाजनक वक्तव्यानंतर सत्यस्थिती जगासमोर येऊ लागली. रशिया युद्ध आता तिसऱ्या वर्षात प्रवेश करणार असे वाटत असतानाच युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्याकडे सैन्याची वानवा असून शस्त्र पुरवठाही मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याची जाहीर तक्रार केली. त्यांच्या या तक्रारीमुळे अमेरिका आणि त्याच्या मित्र पक्षांचे पितळ उघडे पडले आहे.

फिनलँड आणि स्वीडनला यंदाच्या वर्षांत नाटो संघटनेचे सदस्यपद प्राप्त झाले. त्यांच्या बरोबरीने युक्रेनलाही नाटोमध्ये सहभागी करून घेणार असल्याची माजी नक्कलकाराची आशा निराशेत परावर्तीत झाली. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनला सदस्य करून घेणे शक्य नसल्याचे अनेक सदस्यांचे मत आहे. युक्रेनला नाटोचे सदस्यत्व मिळायच्या अगोदरच रशियाने युद्ध सुरु केल्याने ती नाटोसाठी अडचणीची बाब ठरली आहे. नाटो संघटनेच्या घटनेप्रमाणे संघटनेतील कोणाही एका सदस्य देशावर बिगर नाटो देशाने हल्ला केल्यास तो संपूर्ण नाटोसदस्य देशांवर झालेला हल्ला असे मानण्यात येते. पण तांत्रिकदृष्ट्या युक्रेनला सदस्य म्हणून घेण्याअगोदरच रशियाने युद्ध पुकारल्याने नाटो देशांना  त्याला आपल्या संघटनेचे सदस्यत्व बहाल करणे शक्य झालेले नाही.

Advertisement

रशियाने युक्रेन विरोधात युद्ध छेडल्याने अमेरिकेला अत्यानंद झाला होता. युक्रेनला नाटोच्या सदस्यत्वाचे गाजर दाखवून अमेरिका आणि त्याचे मित्रदेश रशियाला खिजवत होते. फेब्रुवारी 2022 मध्ये अमेरिकेला हवा असलेला निकाल मिळाला. रशियाचे सर्वेसर्वा ब्लादिमीर पुतीन यांना युक्रेनवरील आपली स्वारी केवळ पंधरा ते वीस दिवसांची असेल असा कयास बांधला होता. पण तो अमेरिकेच्या धूर्त चालीमुळे फेल ठरला. रशियाविरोधात दंड थोपटण्याची आयतीच संधी प्राप्त झाली होती. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी युक्रेनला मोठ्याप्रमाणात शस्त्र पुरवठा सुरु केला. अर्थात हा शस्त्र पुरवठा सर्व सदस्य नाटो देशांकडून होत आहे. सुरुवातीला युक्रेनला सैनिकी मदत पुरविण्याच्या नाटोच्या प्रयत्नांना पुतीन यांनी जबाब देताना अमेरिका अथवा नाटो सैनिक युक्रेनच्या भूमीवर उतरल्यास आपण सर्वंकष युद्ध मानणार असल्याची धमकी देत गरज पडल्यास नाटो सदस्य देशांवर अण्वस्त्र हल्ला करण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचे स्पष्ट केले.

पुतीनच्या गर्जनेने अमेरिका आणि नाटो सदस्य देशांनी केवळ शस्त्र आणि अन्न पुरवठा करण्यावर भर दिला. रशियाला आता जर्जर केल्यानंतर अमेरिकेला आव्हान देण्यास आणखीन कोणती महाशक्ती राहणार नसल्याने युक्रेनला रसद पुरवठा सुरु झाला. पण दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतरही रशिया युद्धाचे मैदान सोडण्यास तयार नाही. या युद्धामुळे रशियाची अर्थव्यवस्था कोलमडण्याऐवजी नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाच्या कुटनितीमुळे ती अधिक बळकट बनली. या उलट युक्रेन सरकारने आता हात टेकवायला सुरुवात केली आहे. कदाचीत अमेरिकेतील निवडणुकीत विद्यमान सरकारच्या निवडणूक उमेदवार कमला हॅरिस अपयशी ठरणार असल्याचा कयास लगावल्यानेच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदोमीर झेलेन्स्की यांनी आपली निराशा जगजाहीर केली.

रशियाचे सर्वेसर्वा राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या नेतृत्वाखाली पाच देशांच्या ब्रिक्स संघटनेच्या शिखर संमेलनाच्या काळातच युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी आपली निराशा व्यक्त केल्याने ते लक्षवेधी वक्तव्य ठरले. राष्ट्राध्यक्ष पुतीन दिवसेंदिवस

प्रभावशाली होत असल्याने ही निराशा जाणवली. ब्रिक्स संघटनेची सदस्य संख्या आता पाचवरून दहावर पोहोचल्याने पश्चिमी देशांसाठी ते एक आव्हान ठरत आहे. ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेच्या पाच सदस्यीय ब्रिक्स संघटनेत यंदा इराण, इथिओपिया, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांनी सदस्यत्व मिळविले. तर तुर्कस्तान, पाकिस्तान व अन्य 11 देशांना भविष्यात या संघटनेत सहभागी करून घेण्यात येणार असल्याने रशियाच्या नेतृत्वाखालील ब्रिक्स संघटना नाटोसाठी भारी ठरणार असल्याने तो झेलेन्स्कीसाठी आता चिंतेचा विषय बनला आहे.

रशिया आता बलाढ्या बनत चालला असून त्याला एकाकी पाडण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरल्यानेच त्याचा विपरीत परिणाम युक्रेनीयन सैनिकांवर होऊ लागला असून ते युद्धभूमी सोडून जात आहेत. हजारो सैनिकांना विरगती प्राप्त झाली असून शेकडो सैनिक विकलांग बनलेले आहेत तर हजारोंच्या संख्येने सैनिक इस्पितळात उपचार घेत आहेत. अशा या स्थितीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदोमीर झेलेन्स्की यांनी जाहीर केलेली निराशा म्हणजेच युद्ध समाप्तीच्या दिशेने चाललेली वाटचाल असेच म्हणावे लागेल.

- प्रशांत कामत

Advertisement
Tags :

.