वक्फ विधेयक समिती पाच राज्यांना भेट देणार
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी अहवाल सादर करणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वक्फ विधेयकावर स्थापन करण्यात आलेली संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) पुढील आठवड्यात आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या पाच राज्यांना भेट देणार आहे. याआधी 4-5 नोव्हेंबर रोजी दिल्लीत मुस्लीम महिला, शिक्षणतज्ञ, वकील आणि सामाजिक-धार्मिक संघटनांसोबत बैठकही होणार आहे. या समितीला संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आपला अहवाल सादर करायचा आहे. पुढील महिन्यात 25 नोव्हेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.
वक्फसंबंधी जेपीसी समितीला वेळेत अहवाल सादर करता यावा यासाठी राज्यांच्या दौऱ्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी समित्यांच्या अहवाल सादर करण्याची तारीख वाढवण्यात आल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र समितीचे अध्यक्ष भाजपचे खासदार जगदंबिका पाल यांना दिलेल्या मुदतीत अहवाल सादर करायचा आहे. जेपीसी सदस्य पाच राज्यांच्या राजधान्यांमध्ये त्यांचे अल्पसंख्याक व्यवहार विभाग, कायदा विभाग, अल्पसंख्याक आयोग आणि वक्फ बोर्ड यांच्याशी संवाद साधतील. ती बार कौन्सिल आणि मुत्तवल्ली असोसिएशनसह इतर भागधारकांनाही भेटणार आहे. ही समिती 9 नोव्हेंबर रोजी आसामची राजधानी गुवाहाटी येथून आपला दौरा सुरू करणार आहे. यानंतर 11 नोव्हेंबरला भुवनेश्वर (ओडिशा), 12 नोव्हेंबरला कोलकाता (पश्चिम बंगाल), 13 नोव्हेंबरला पाटणा (बिहार) आणि 14 नोव्हेंबरला लखनौ (उत्तर प्रदेश) येथे जाईल.