लोकमान्य टिळकांच्या विचारांनुसारच लोकसेवेचे व्रत!
किरण ठाकुर यांचे प्रतिपादन, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची डी. लिट प्रदान : टिळकांच्या आदर्शानुसार ‘तरुण भारत’ व ‘लोकमान्य’ची वाटचाल
पुणे : लोकमान्य टिळकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊनच आम्ही प्रत्येक कार्यात यशस्वी झालो आहोत. माझे वडील लोकमान्यांचे अनुयायी होते. लोकमान्यांच्या विचाराने प्रेरित होऊनच त्यांनी स्वातंत्र्यलढ्यासह सामाजिक, शैक्षणिक कार्यात सहभाग घेण्याची भूमिका घेतली. आजही लोकमान्यांच्या विचारांनुसारच लोकसेवेचे व्रत हाती घेत ‘तरुण भारत’ व ‘लोकमान्य सोसायटी’ची वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन ‘तरुण भारत’ समूहप्रमुख व सल्लागार संपादक व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांनी शनिवारी येथे केले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या 40 व्या पदवीप्रदान सोहळ्यात किरण ठाकुर यांच्यासह ज्येष्ठ उद्योजक डॉ. नौशाद फोर्ब्स, भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांना सन्माननीय डी. लिट. (विद्यानिधी) देऊन गौरविण्यात आले. गायकवाड यांच्यावतीने त्यांच्या पत्नी वैशाली गायकवाड यांनी सन्मान स्विकारला. त्यावेळी किरण ठाकुर बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, कुलगुऊ डॉ. गीताली टिळक, टिमवि ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, विश्वस्त डॉ. प्रणती रोहित टिळक, विश्वस्त सरिता साठे यांच्यासह विविध विद्या शाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते. यावेळी 20 विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या 1 हजार 46, तर पदवी अभ्यासक्रमाच्या 1 हजार 840 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कौशल्य विकास शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या 185 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. सुवर्ण पदके मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा पदके देऊन गौरव करण्यात आला.
किरण ठाकुर म्हणाले, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची डी. लिट पदवी हा माझ्या जीवनातील अत्यानंदाचा क्षण आहे. माझे वडील स्वातंत्र्यसेनानी होते. लोकमान्य टिळकांचे अनुयायी म्हणून ते ओळखले जात. त्यांच्याकडून आपल्याला वारसा मिळाला. भारत वैभव समाज या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली. रात्रशाळा, वाचनालये सुरू केली. ‘केसरी’प्रमाणेच आमच्या दैनिक ‘तऊण भारत’ने अनेकांना न्याय देण्याची भूमिका घेतली. माझे वडील चळवळीशी जोडलेले असल्याने कायम तरुण राहिले. असा समृद्ध वारसा आपल्याला लाभला आहे, असे सांगत लोकमान्यांनी गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव सुरू केला. आज पुण्यापाठोपाठ बेळगावमध्ये अत्यंत व्यापक स्वऊपात गणेशोत्सव तसेच शिवजयंती साजरी करण्यात येत असल्याकडेही किरण ठाकुर यांनी लक्ष वेधले. तऊणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आपण टिळकवाडीत ‘लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप सोसायटी’ची स्थापना केली. त्यानंतर लोकमान्यचा एवढा विस्तार झाला, की 100 वी शाखा लोकमान्य टिळकांच्या पुण्यातील वाड्यातच सुरू झाली. दीपक टिळक व शैलेश टिळक यांनी त्याकरिता जागा उपलब्ध करून दिली. आज लोकमान्यची उलाढाल 15 हजार कोटीच्या वर पोहोचली आहे. तर 8,300 कोटीच्या ठेवी आहेत. यातील 2500 कोटी ठेवी एकट्या पुण्यातील आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
जयंतराव टिळकांशी ऋणानुबंध
ज्येष्ठ नेते कै. जयंतराव टिळक यांच्याही आठवणी किरण ठाकुर यांनी यावेळी जागवल्या. ते म्हणाले, गोवा मुक्तीसंग्रामाबरोबरच संयुक्त महाराष्ट्राचेही जयंतराव टिळक हे पहिले सत्याग्रही होते. आमचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध होते. चळवळीतील लोकांचा ते आदर करायचे. सभापती असताना त्यांचे कार्यालय हे सर्वांकरिता खुले असायचे, असेही किरण ठाकुर यांनी सांगितले.
खुल्या आर्थिक धोरणातूनच देशाला नवी दिशा : डॉ. फोर्ब्स
सत्काराला उत्तर देताना डॉ. नौशाद फोर्ब्स म्हणाले, मी फोर्ब्सला काम करीत होतो व स्टॅनफोर्ड विद्यापीठात अध्यापनही करीत होतो. नोकरी, अध्यापन यापैकी काय आवडते, असे मला विचारण्यात येते. तेव्हा मी अध्यापन, हेच सांगतो. कारण यातून भरपूर शिकायला मिळाले. परंतु, समाजाला, विद्यार्थ्यांना आपण काही देणे लागतो. तत्त्वे शिकवितो व त्यातून समाज समृद्ध होतो, ही गोष्ट खूप समाधान देऊन जाते. 1991 मध्ये देशाने खुले आर्थिक धोरण स्वीकारले. त्यामुळे भारत खूप पुढे गेला. आज जगातील काही टॉप अर्थव्यवस्थांपैकी आपण एक आहोत. यात सर्वांत मोठा वाटा हा प्रायव्हेट सेक्टरचा आहे. विविधतेत एकता ही आपली सर्वांत मोठी ताकद आहे. प्रत्येकाची वेगवेगळी मते असणे हेही खूप महत्त्वाचे असून, त्यातूनच लोकशाही बळकट होते, असे विचारही त्यांनी मांडले. गायकवाड यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने आज माझा गौरव केला. हा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. बीव्हीजी ग्रुपतर्फे देशभरात स्वच्छतेचे काम केले जाते. तसेच 108 ऊग्णवाहिका आणि औषधनिर्माण शास्त्रात काम केले जात आहे. हे काम करण्यासाठी आणखी ऊर्जा मिळणार आहे. जगभरात जाळे निर्माण करण्यासाठी मिळालेल्या पुरस्काराने ताकद मिळाली असल्याचे यावेळी गायकवाड यांनी सांगितले. प्रभारी कुलसचिव डॉ. सुवर्णा साठे यांनी प्रास्ताविक केले. कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांनी विद्यापीठातील विविध विभागांचा आढावा घेतला. डॉ. दीपक टिळक यांनी दीक्षांत भाषण केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पसायदानने कार्यक्रमाची सांगता झाली. स्वप्निल पोरे यांनी हणमंतराव गायकवाड यांच्या मानपत्राचे, अतिफ सुंडके यांनी डॉ. नौशाद फोर्ब्स यांच्या मानपत्राचे, तर डॉ. अंबर बेहरे यांनी किरण ठाकुर यांच्या मानपत्राचे वाचन केले. सूत्रसंचालन वसुंधरा काशीकर यांनी केले.
डॉ. किरण ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त आज कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन : विविध क्षेत्रातील मान्यवरांचा लोकगौरव पुरस्काराने होणार सन्मान
लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑपरेटिव्ह सोसायटी लि.चे संस्थापक-अध्यक्ष व तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांच्या 72 वाढदिवसाच्या निमित्ताने रविवारी लोकमान्य सोसायटीच्या पुणे विभागातर्फे कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. निमंत्रितांसाठी हा सोहळा असणार आहे. या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने पुणे स्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांना लोकगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑपरेटिव्ह सोसायटी लि. च्या पुणे विभागाचे व्यवस्थापक सुशील जाधव म्हणाले की, पुणे आणि लोकमान्य सोसायटीचा एक वेगळा ऋणानुबंध आहे. हा धागा अधिक दृढ व्हावा या उद्देशाने आम्ही डॉ. किरण ठाकुर सरांच्या वाढदिनाच्या औचित्याने विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या सामान्यातील असामान्य पुणेकरांच्या कर्तृत्वांचा सन्मान करणार आहोत.