अतिवाड अॅप्रोच रोडची अक्षरश: दुर्दशा
तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी
वार्ताहर/उचगाव
अतिवाड ऑप्रोच रोड या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. सदर रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी अतिवाड गावातील ग्रामस्थांनी केली आहे. बेकिनकेरे ते कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या या अतिवाड अॅप्रोच रस्त्याची दुर्दशा झाली आहे. गावांमध्ये ये-जा करण्यासाठी सदर रस्ता महत्त्वाचा असून या रस्त्यातील तीन किलोमीटर अंतराचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले असून रात्रीच्या वेळी प्रवास करणे मुश्किल झाले आहे. जंगलातून हा रस्ता जात असल्याने जंगली जानवरांचेही या मार्गावरती सातत्याने भीतीचे वातावरण असते. यासाठी तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी गावातील नागरिकांतून, ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.
गावातील नागरिकांनी तातडीने या दोन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सध्या पावसाळा संपत आला असला तरी इथून पुढे धुळीचा प्रादुर्भाव वाढणार आहे. याचा प्रवासीवर्गाला त्रास सहन करावा लागणार आहे. सध्या अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे या खड्ड्यांतून पाणी साचल्याने रात्रीच्या अंधारात खड्ड्यांचा आणि पाण्याचा अंदाज येत नसल्याने अपघातांची मालिकाच सुरू झाली आहे. अनेकांची वाहने नादुरुस्त होत असून छोटे-मोठे अपघातही या खड्ड्यांमुळे होत आहेत. यासाठी तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.