खलनायकाला 800 वर्षांपासून दिली जाते शिक्षा
विश्वासघातकी राजाच्या मूर्तीला मारली जाते लाथ
चीनच्या इतिहासातील कुख्यात खलनायकाला तेथील लोक अद्याप विसरलेले नाहीत. हा खलनायक किन हुई आणि त्याची पत्नी वांग शी आहे. चीनच्या हांगझोउ शहराच्या वेस्ट लेकनजीक एका मंदिरानजीक या दोघांच्या लोखंडी मूर्ती बसविण्यात आल्या आहेत. या मूर्ती गुडघ्यावर बसलेल्या स्वरुपात असून चेहरे झुकलेले आणि त्यांचे हात मागे आहेत.
मूर्ती पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा भाव असल्याचे वाटते, येथे येणारा पर्यटक या मूर्तींना थप्पड लगावतो आणि लाथ मारतो. तर काहीजण या मूर्तीवर थुंकतात. या निर्जीव मूर्तींसोबत अशा विचित्र वर्तनामागे सूडाची भावना आणि विश्वासघातासाठी दंड देण्याचा हेतू आहे. चीनचे नागरिक चिनी राष्ट्रनायकाचा विश्वासघात करणाऱ्या या दोन व्यक्तींच्या मूर्तीना मागील 800 वर्षांपासून थप्पड लगावत अन् लाथ मारत आहेत. चीनमध्ये ही परंपरा आजही जारी आहे.
चीनच्या इतिहासात किन हुई आणि त्याची पत्नी वांग शी यांना कुख्यात जोडपे म्हणून आठवले जाते. हे दोघेही दक्षिण सॉन्ग राजघराण्यादरम्यान (1127-1279) देशद्रोह आणि विश्वासघाताचे प्रतीक ठरले होते. ही कहाणी विशेषकरून महान चिनी देशभक्त सेनापती यूए फेई यांच्यासोबत जोडलेली असून त्यांच्या हत्येमागे किन हुईची मुख्य भूमिका होती.
किन हुई सॉन्ग राजघराण्याचा एक प्रभावशाली चॅन्सेलर होता. त्या काळात सॉन्ग राजघराणे उत्तर चीनमध्ये जिन राजघराण्यासोबत युद्धात गुंतून पडले होते. याच राज्यात यूए फेई हा शूर सेनापती होता. या सेनापतीने जिन विरोधात अनेकदा यश मिळविले होते. यूए फेई हा सॉन्ग राजघराण्याची गमावलेली भूमी परत मिळविण्यासाठी प्रतिबद्ध होता. परंतु किन हुईचे विचार वेगळे होते आणि तो स्वत:ची पात्रता सम्राट गाओजोंगसमोर दाखवू पाहत होता. याचमुळे त्याने सम्राटाचे कान भरण्यास सुरुवात केली. किन हुईने युए फेईवर खोटे आरोप केले, त्याला देशद्रोही सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. यूए फेईने राजघराण्याचा आदेश मानण्यास नकार दिल्याचा कांगावा त्याने केला.
जनरल हान शिजहोंग यांनी यूए फेईचा गुन्हा कोणता होता असे विचारल्यावर किन हुईने ‘कदाचित काही असावा, हे निश्चित नाही’ असे उत्तर देल होते (चिनी भाषेत मो शू योऊ). हे शब्द नंतर चिनी भाषेत खोट्या आरोपांना पर्याय ठरले होते.
यानंतर यूए फेईला 1142 साली अटक करण्यात आली आणि तुरुंगात त्यांची हत्या करण्यात आली. ही हत्या किन हुईने घडवून आणल्याचे मानले जाते. या घटनेने किन हुई आणि त्याची पत्नी वांग शी हे चिनी लोकांच्या नजरेत घृणास्पद ठरले. किनने एका शूर सेनापतीला कटात अडकवून त्याचा जीव घेतल्याचा संदेश लोकांमध्ये गेला. या कटात वांग शी सामील होती असे मानले जाते.
लोखंडी मूर्ती अन् जनतेचा संताप
यूए फेईच्या हत्येनंतर त्याचे शौर्य आणि देशभक्तीला सन्मान देण्यासाठी हांगझोउ शहरात वेस्ट लेकनजीक यूए फेई मंदिर निर्माण करण्यात आले. परंतु जनता किन हुई आणि त्याच्या पत्नीवर नाराज होती. त्यांना शिक्षा देण्यासाठी या मंदिरासमोर किन हुई, वांग शी आणि त्यांचे दोन सहकारी (मोकी शिए आणि झांग जून) यांच्या लोखंडी मूर्ती स्थापन करण्यात आल्या होत्या. मागील 800 वर्षांपासून लोक या मूर्तींवर थुंकत, लाथ मारत आणि थप्पड लगावत राहिले आहेत. हे स्थान आजही पर्यटक आणि इतिहासप्रेमींसाठी महत्त्वपूर्ण स्थळ आहे, जेथे लोक या ऐतिहासिक अन्यायाची कहाणी आठवत असतात