For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तोफेचा इशारा मिळताच आचरावासीय गावात परतले

03:04 PM Dec 19, 2024 IST | अनुजा कुडतरकर
तोफेचा इशारा मिळताच आचरावासीय गावात परतले
Advertisement

गाव भरण्याचा देवाचा कौल होताच तात्पुरते संसार झटक्यात आवरले

Advertisement

आचरा प्रतिनिधी

आपल्या विविध रुढी, परंपरा संस्थानी थाटात जपणाऱ्या आचरा गावची गावपळण इनामदार श्री देव रामेश्वराने गुरुवारी चार रात्रींचा मुक्काम पार पडल्यानंतर गावात परतण्याकरीता कौल दिल्याने अत्यंत उत्साहात समाप्त झाली. श्री रामेश्वर मंदिरात गाव भरण्याचा तोफेचा इशारा होताच संपूर्ण गाव सहजीवनाचा अनोखा आनंद गाठीशी बांधत माघारी परतले. दर तीन वर्षांनी होणाऱ्या गावपळणीकरीता यावर्षी कौल दिल्याने 15 ते 19 डिसेंबर या कालावधीत ही गावपळण पार पडली. मुंबईचे चाकरमानी, नातेवाईक, शेजारी गावातील लोक या गावपळणीत अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते.

Advertisement

पारवाडी नदीकिनारी, भगवंतगड सीमांबा, आडवंदर, वायंगणी माळरानावर, चिंदर - सडेवाडी आदी ठिकाणी आचरावासीयांनी झोपड्या उभारून आपले तात्पुरते नवे संसार थाटले होते. उत्तरोत्तर या गावपळणीची रंगत अधिकच वाढत गेली होती. आधुनिक काळातील रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही क्षण आचरावासीयांनी निसर्गाच्या सान्निध्यात कोणत्याही कामकाजाव्यतिरिक्त घालविले होते. सध्याचे जीवनमान एवढे व्यस्त झालेले आहे की, शेजारी पाजारी कित्येक वर्षे एकमेकांना मनमोकळेपणाने भेटू शकत नाहीत. असे असताना गावपळण ही प्रथा आचरावासियांना हवीहवीशी वाटते. गावी न परतण्याचा रामेश्वराचा कौल झाल्याने एक रात्रीचा मुक्काम वाढला. चार रात्रीच्या मुक्कामानंतर रामेश्वराचा गाव भरण्याचा कौल झाल्याने आचरावासीय गुरुवारी मिळेल त्या वाहनाने आपल्या मूळ घराकडे धाव घेऊ लागले. रामेश्वराने गाव भरण्याचा कौल दिल्याची वार्ता क्षणार्धात पसरताच सर्वांनी ठिकठिकाणी थाटलेले आपले तात्पुरते संसार एका झटक्यात आवरते घेतले.

गावपळण कालावधीत रानावनात, काट्याकुट्यात वास्तव्य करून राहणाऱ्या आचरावासीयांना कित्येक वर्षांच्या अनुभवानुसार देव रामेश्वर यांच्यावर असलेल्या त्यांच्या नितांत श्रद्धेमुळे कोणत्याही अनुचित प्रकाराला सामोरे जावे लागले नाही. जुन्या जाणत्या आचरावासीयांना याविषयी विचारणा केली असता, आचरा गावपळण श्री रामेश्वरावर असलेल्या श्रद्धेपोटी आम्ही करत आहोत. त्यांनी आमची संपूर्णतः जबाबदारी घेतली असल्याने इतक्या वर्षाच्या गावपळणीच्या इतिहासात कोणताच वाईट प्रकार घडला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आचरा पोलिसांनी अत्यंत सुव्यवस्थित बंदोबस्त राखत गावपळण पार पाडण्याकरीता सहकार्य केले. आचरा आरोग्य केंद्रातून पथके तयार करून राहुट्या करून राहिलेल्या गावकऱ्यांना आरोग्य सुविधा पुरवली.फेसबुक व्हाट्सअँप , इंस्टाग्रामच्या माध्यमातून गाव भरण्याचा कौल क्षणार्धात आचरावासीयांपर्यंत पोहोचल्याने त्यांनी तत्काळ गावी परतण्यास सुरुवात केली आहे. गावपळणीच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेले आचरावासीय हळूहळू माघारी परतणार आहेत, शुक्रवारी मात्र आचरा गावचे जीवनमान पूर्वपदावर येणार आहे.

Advertisement
Tags :

.