डॉ. रुपेश पाटकर यांना स्नेहसेतू जीवनगौरव पुरस्कार
सावंतवाडी : प्रतिनिधी
कोल्हापूर करवीर येथील जाणीव चॅरिटेबल फाऊंडेशन संचलित मनोबल व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रातर्फे स्नेहसेतू जीवनगौरव पुरस्कार बांदा सावंतवाडी येथील मानसोपचारज्ञ डॉ. रुपेश आनंद पाटकर यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सावली केअर सेंटर, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आणि कोल्हापूर प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता मनोबल व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र, दिंडनेर्ली, देवळे, ता. करवीर, कोल्हापूर येथे होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी सावली केअर सेंटरचे किशोर देशपांडे आहेत.स्नेहसेतू जीवनगौरव पुरस्कारप्राप्त डॉ. रुपेश पाटकर यांचा जीवनपट, कार्याची व्याप्ती, विविध विषयांवरचे सखोल आणि वेगळे विचार समजून घेण्यासाठी डॉ. पाटकर यांच्यासोबत रविदर्शन कुलकर्णी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता कोल्हापूर मेडिकल असोसिशन हॉल, जयप्रभा स्टुडिओ समोर, बेलबाग कोल्हापूर येथे होणार आहे.