For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वाधिक दुर्लभ घटक आढळणारे गाव

06:47 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
सर्वाधिक दुर्लभ घटक आढळणारे गाव
Advertisement

यटरबी हे जगातील सर्वात अनोखे गाव असून ते स्वीडिश बेट रेसारोवर आहे. या गावात अन्य ठिकाणांच्या तुलनेत सर्वाधिक दुर्लभ घटक आढळून आले आहेत. यातील प्रत्येक दुर्लभ घटक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या घटकांच्या शोधामुळे विज्ञानाला एक नवी दिशा मिळाली आहे. हे सर्व दुर्लभ घटक या गावातील एका खाणीतून मिळविण्यात आले असून एकाच खनिजापासून वेगळे करण्यात आले आहेत.

Advertisement

यटरबी गावात यट्रियम, यट्रिबियम, टर्बियम, एर्बियम, गॅडोलीनियम, थ्यूलियम, स्कँडियम, होल्मियम, डिस्प्रोसियम आणि टुटेनियम हे दुर्लभ घटक आढळून आले आहेत. हे दुर्लभ घटक निसर्गात अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतात. या घटकांना शोधण्याकरता रसायनशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिकांना दशकांचा कालावधी लागला आहे.

1787 मध्ये रसायनशास्त्रज्ञ कार्ल एक्सल अरहेनियसने यटरबी गावातील एका खाणीत एका खनिजाचा शोध लावला होता, ज्याला त्यांनी यटरबाइट नाव दिले होत, ज्याच्या नमुन्याचे रसायनशास्त्रज्ञांनी परीक्षण करत त्यावर संशोधन केले होते. 1789 मध्ये ओबो विद्यापीठाचे रसायनशास्त्रज्ञ जोहान गॅडोलिन यांनी यटरबाइट खनिजात पहिला दुर्लभ घटक यट्रियमचा शोध लावला होता.  पुढील 100 वर्षांमध्ये या खनिजामधून आणखी 9 दुर्लभ घटक वेगळे करण्यात आले. पुढील काळात या खनिजाचे नाव येटरबाइटऐवजी गॅडोलिनाइट करण्यात आले आहे.

Advertisement

दुर्लभ घटकांचा वापर

आढळण्यात आलेले हे दुर्लभ घटक अनेक ठिकाणी वापरले जातात. यातील यट्रियमचा वापर एलईडी, टेलिव्हिजन सेट कॅथोड रे ट्यूब डिस्प्ले, इलेक्ट्रॉनिक फिल्टर, लेझर, सुपरकंडक्टर्समध्ये करण्यात येतो. टर्बियमचा वापर सेमी-कंडक्टर, टीव्ही स्क्रीन, फ्लोरोसेंट लॅम्प, नेवल सोनार सिस्टीम आणि सेंसर निर्मितीकरता केला जातो. एर्बियमचा वापर लेझर, ऑप्टिकल एम्पलीफायर्स, दंतचिकित्सेकरता केला जातो. यटरबियमचा वापर स्टेनलेस स्टील, अॅक्टिव्ह लेझर मीडियाच्या डोपेंट आण्विक घड्याळांमध्ये केला जातो.

Advertisement
Tags :

.