70 वर्षांपासून गावात एकच विचारसरणी
जगात अनेक विचारसरणी निर्माण झाल्या आणि कालौघात हरवून गेल्या. परंतु कम्युनिजम म्हणजेच साम्यवादाचा प्रभाव आजही अनेक ठिकाणी कायम आहे. चित्रपटांमध्ये लाल झेंडा अन् डाव्या विचारसरणीने भारलेल्या अनेक लोकांच्या कहाण्या पाहिल्या असतील. परंतु भारतात एका गावात कम्युनिझम केवळ राजकीय विचारसरणी नसून तेथे जगण्याची पद्धतच ठरली आहे. तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील टी. कल्लुपट्टीपासून काही अंतरावर वन्नीवेलमपट्टी गावात पाऊल ठेवल्यावर तुम्हाला जणू क्रांतिकारी भूमीवर आल्याचा भास होईल. येथील प्रत्येक घर अन् गल्लीत लाल झेंडे फडकत असतात. गावातील भिंतीवर चे ग्वेरा, फिडेल कॅस्ट्रो आणि कार्ल मार्क्सचे चेहरे रंगविण्यात आलेले आहेत.
या गावातील मुलांना देखील मार्क्स, चे ग्वेरा आणि कॅस्ट्रोचे नाव माहिती असते. नागजोथी नावाच्या महिलेने स्वत:च्या मुलींना मार्क्सिया आणि लेनिना अशी नावे ठेवली आहेत. जर मला मुलगा असता तर त्याचे नाव लेनिन ठेवले असते, असे ती सांगते. या गावात विचारसरणी केवळ चर्चेचा विषय नव्हे तर लोकांची ओळख ठरली आहे. वन्नीवेलमपट्टी गाव मागील 70 वर्षांपासून साम्यवादाच्या विचारसरणीला जगत आहे. गावातील वृद्ध महिला देखील स्वत:च्या हातांवर हातोडा अन् विळ्याचा टॅटू काढून घेत अभिमान बाळगत असतात. वाहने, टी-शर्ट्स आणि भिंतीवर कम्युनिस्ट प्रतीकं स्पष्टपणे पाहता येतात.
तंजावर हत्येने बदलले गावाचे भविष्य
1968 मध्ये तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यात एक भयानक घटना घडली. तेथे 44 गरीब मजुरांना एका खोलीत बंद करून जाळण्यात आले होते. या घटनेने वन्नीवेलमपट्टी गावावर मोठा प्रभाव पडला. गावातील वेम्बुली नावाच्या व्यक्तीने या घटनेतून प्रेरणा घेत गावात साम्यवादाची शाखा स्थापन केली. यानंतर येथील मानसिकता अधिकच साम्यवादी ठरत गेली.