For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पिडीतेवर झाला नृशंस लैंगिक अत्याचार

06:55 AM Aug 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
पिडीतेवर झाला नृशंस लैंगिक अत्याचार
Advertisement

कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल सादर, प्रतीक्षा डीएनए अहवालाची

Advertisement

वृत्तसंस्था / कोलकाता

कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेवर झालेल्या क्रूर बलात्कार आणि हत्या प्रकरणातला शवविच्छेदन अहवाल सादर झाला आहे. या महिलेवर अत्यंत निर्घृण पद्धतीने लैंगिक अत्याचार करण्यात आला. तिने गुन्हेगाराचा जोरदार प्रतिकार केला पण अखेरीस तिची शक्ती कमी पडली, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement

पिडितेच्या चेहऱ्यापासून गुप्तांगांपर्यंत सर्व स्थानी गंभीर जखमा झाल्या आहेत. अशा एकंदर 14 जखमा आहे. डोके, चेहरा, मान, गुप्तांगे यांच्यावरील जखमा खोल आहेत. यावरुन तिच्यावर अत्यंत क्रूरपणे दुष्कर्म करण्यात आल्याचे दिसून येते. तिचा गळा आवळून आणि चिरडून खून करण्यात आला आहे, असेही या अहवालात स्पष्टपणे नोंद करण्यात आले आहे. तो सोमवारी सादर झाला आहे.

कपडे फाटलेल्या स्थितीत

या महिला डॉक्टरवर ती गाढ झोपेत असताना दुष्कर्म करण्यात आले. तिला जाग आल्यानंतर तिने जोरदार प्रतिकार केला. गुन्हेगारांनी तिला पाडवून अत्यंत निर्दयी पद्धतीने सर्व प्रकारचे अत्याचार केले. नंतर गळा आवळून तिची हत्या केली. तिच्या मृतदेहावरचा शर्ट पूर्ण फाटलेल्या अवस्थेत होता तर अंगावर पँट आणि अंतर्वस्त्रे नव्हती. तिच्या शरीरावर आणि गुप्तांगांवर रक्ताचे मोठे डाग दिसून आले. यावरुन तिच्यावर किती भयानक अत्याचार झाला आहे, हे स्पष्ट होते, असे शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी स्पष्टपणे नोंद केलेले आहे.

गुन्हेगार एक की अनेक

डॉक्टर महिलेवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांची संख्या किती होती, हा अद्यापही अनुत्तरित प्रश्न आहे. या प्रश्नाचे नेमके उत्तर डीएनए अहवालातूनच स्पष्ट होणार आहे. डीएनए चाचणी करण्याची प्रक्रिया जटील असल्याने त्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. तथापि, गुन्हेगारांची संख्या समजण्यासाठी हे परीक्षण आवश्यक आहे. ज्या पद्धनीने गुन्हा करण्यात आला आहे, त्यावरुन हे एका गुन्हेगाराचे दुष्कृत्य असेल असे वाटत नाही. हे सामूहिक बलात्काराचे आणि हत्येचे प्रकरण आहे, असा संशय अनेक डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

पिडीतेच्या मातेचा बॅनर्जी सरकारवर आरोप

ममता बॅनर्जी यांच्या सरकारने आणि कोलकाता पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मृतदेहावर दहन संस्कार घाईगडबडीने करण्यात आले आहेत. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच राज्य सरकारने या प्रकरणी होत असलेले तीव्र आंदोलनही चिरडण्याचा प्रयत्न चालविला आहे, असे अनेक आरोप पिडित महिला डॉक्टरच्या मातेने केले आहेत.

आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

या अतिगंभीर प्रकरणाची नोंद सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून घेतली असून आज मंगळवारी यावर तेथे सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालय आतापर्यंतच्या तपासावर आणि एकंदर या प्रकरणाच्या प्रशासकीय हाताळणीवर कोणती भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेतील खंडपीठासमोर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे.

9 ऑगस्टचे प्रकरण

9 ऑगस्टला या महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. प्रथम पोलिसांनी ही आत्महत्या असल्याची घोषणा केली होती. तथापि, तिच्या मृतदेहाच्या स्थितीवरुन ती आत्महत्या नसून खून आहे, असे तिच्या सहकाऱ्यांचे आणि मातापित्यांचे म्हणणे होते. अखेर हे प्रकरण बलात्कार करुन हत्या केल्याचे आहे, हे स्पष्ट झाले. नंतर तपासाला प्रारंभ करण्यात आला. मात्र, यात बराच वेळ गेल्याने महत्त्वाचे पुरावे नष्ट झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणाची अतितीव्र प्रतिक्रिया पश्चिम बंगाल आणि साऱ्या भारतात उमटत असून डॉक्टरांनी या विरोधात जोरदार आवाज उठवत आंदोलन चालविले आहे. डॉक्टर महिलेला न्याय मिळेपर्यंत आंदोलन होत राहील असा इशारा राज्यातील डॉक्टरांनी दिला आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे प्रकरण आता तपासासाठी सीबीआयकडे देण्यात आले असून या संस्थेने कसून तपास चालविला आहे.

सीबीआय तपास वेगाने

ड कोलकाता प्रकरणाचा सीबीआयकडून वेगाने आणि काटेकोर तपास

ड शवविच्छेदन अहवालातून अनेक गंभीर बाबी येत आहेत उघडकीस

ड गुन्हेगारांच्या संख्येसंबंधी स्पष्टता केवळ डीएनए अहवालातून येणार

Advertisement
Tags :

.