बाळंतिणींच्या मृत्यूंचे दुष्टचक्र सुरूच
सिव्हिलमध्ये हुक्केरी तालुक्यातील महिलेचा मृत्यू : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप
बेळगाव : बेळगावसह कर्नाटकातील सरकारी इस्पितळांमध्ये झालेल्या बाळंतिणींच्या मृत्यू प्रकरणांवर कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जोरदार चर्चा झाली आहे. या प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्याची तयारी राज्य सरकारने ठेवली असतानाच रविवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूती विभागात आणखी एका बाळंतिणीचा मृत्यू झाला आहे. वैशाली इराण्णा कोटबागी (वय 20) रा. गौडवाड, ता हुक्केरी असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. रविवार दि. 22 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैशालीचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
शनिवार दि. 21 डिसेंबर रोजी तिला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. सकाळी 9.45 वाजता तिच्यावर सिझेरियन करण्यात आले. तिने मुलीला जन्म दिला. त्या मुलीची प्रकृती चांगली आहे. रविवारी सकाळी वैशालीची प्रकृती खालावली. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या दुर्लक्षपणामुळे वैशालीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, या बाळंतिणीचा मृत्यू नेमका कोणत्या कारणासाठी झाला? याचा उलगडा शवचिकित्सा अहवालानंतरच होणार आहे. रविवारी सकाळपर्यंत वैशालीची प्रकृती ठीक होती. सकाळी 7 वाजता छातीत कळा येत असल्याचे तिने सांगितले. 10.30 पर्यंत कोणीच तेथे आले नाहीत, असे वैशालीच्या कुटुंबीयांनी सांगितले. शवचिकित्सेची प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. केवळ एक वर्षापूर्वी तिचे लग्न झाले होते.
आरोग्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करावी
बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 20 वर्षीय वैशाली कोटबागी या महिलेचा बाळाला जन्म दिल्यानंतर मृत्यू झाला. आम्ही महिला मोर्चा भाजप कर्नाटकतर्फे सिव्हिल हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचा तसेच काँग्रेस सरकारच्या दुर्लक्षाचा निषेध करतो. आरोग्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करावी. योग्य काळजी आणि आरोग्य सेवेशिवाय या महिलांचा मृत्यू ही खरी समस्या असून याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. नुकतेच आम्ही हिवाळी अधिवेशनात याच मुद्द्यावर विरोध केला पण निष्फळ ठरला.
- डॉ. सोनाली सरनोबत, भाजप राज्य महिला मोर्चा सचिव