उपराष्ट्रपतींनी घेतली जो बिडेन यांची भेट
कंबोडियामध्ये शिखर परिषदेला केले संबोधित
नोम पेन्ह / वृत्तसंस्था
अमेरिका दौऱयावर असलेले भारताचे उपराष्ट्रपती धनखड यांनी नुकतीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांची भेट घेतली. उपराष्ट्रपती धनखड यांनी नॉम पेन्हमध्ये कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन यांच्यासोबतही स्वतंत्र चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी मानव संसाधन, डी-मायनिंग आणि विकास प्रकल्पांसह दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांवर सविस्तर चर्चा केली. धनखड आणि हुन सेन यांनी नॉम पेन्ह येथे संस्कृती, वन्यजीव आणि आरोग्य क्षेत्रात भारत आणि कंबोडिया यांच्यातील चार सामंजस्य करारांना चालना दिली.
उपराष्ट्रपती धनखड हे पत्नी सुदेश धनखड यांच्यासह 11 नोव्हेंबरपासून कंबोडियाच्या तीन दिवसांच्या दौऱयावर आहेत. 11 नोव्हेंबर रोजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड कंबोडिया येथे भारतीय समुदायाच्या स्वागत समारंभास उपस्थित होते. कंबोडियन भारताला भगवान बुद्धांची पूजनीय भूमी म्हणून पाहतात, त्याचप्रमाणे आपण कंबोडियाला विस्तारित कुटुंब म्हणून पाहतो, असे ते म्हणाले. 12 नोव्हेंबर रोजी उपराष्ट्रपती धनखड यांनी नोम पेन्ह येथे 19 व्या आसियान-भारत शिखर परिषदेत भाग घेतला होता. याप्रसंगी त्यांनी जागतिक अन्न, ऊर्जा सुरक्षा यावर भारताची भूमिका मांडली. भारत आणि आसियान देशांनी दहशतवादाविरोधात सहकार्य वाढवण्याचा संकल्प करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. भारत आसियान देशांसोबत नवीन क्षेत्रांमध्ये भागिदारी सुरू करेल, असेही ते पुढे म्हणाले.