ऑस्ट्रेलियात वेगाने घटतोय पादत्राणांचा वापर
अनवाणी पायांनी फिरण्याचा ट्रेंड
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या लोकांमध्ये अजब बदल दिसून येत आहे. तेथील लोकांना आता अनवाणी पायांनी चालण्याची सवय लागली आहे. तेथे लोक पब किंवा पार्टीत तसेच ऑफिस किंवा शॉपिंगसाठी अनवाणीच फिरताना दिसून येतात. परंतु येथे राहणारा प्रत्येक जण पादत्राणे वापरत नाही असे देखील नाही. पण बहुतांश लोक रस्त्यांपासून क्रीडामैदानापर्यंत अनवाणीच दिसून येऊ शकतात. अनवाणी फिरण्याचा हा प्रकार नवा नाही. न्यूयॉर्क टाइम्सचे लेखक सेथ कुगेल यांनी 2012 मध्ये न्यूझीलंडच्या प्रवासादरम्यान पहिल्यांदा हा ट्रेंड पाहिला होता. लोक अनवाणी पायांनी फिरत होते, प्रत्येक जण असे करू शकत नाही. परंतु अनवाणी फिरण्याचा हा प्रकार चकित करणारा होता. शहरातील फुटपाथ स्वच्छ आहेत, परंतु तरीही ते फुटपाथच असल्याचे कुगेल यांचे म्हणणे होते. युवांमध्ये अनवाणी पायांनी हिंडण्याचा ट्रेंड जोर पकडू लागला आहे. शाळांमध्ये देखील मुलांना अनवाणी राहण्याचे लाभ सांगण्यात येतात. पर्थमध्ये एका प्राथमिक शाळेत उत्तम बॉडी पॉश्चर, मजबूत पाय आणि शरीर यासारख्या संभाव्य फायद्यांचा दाखला देत विद्यार्थ्यांना अनवाणी शाळेत येण्याची अनुमती देण्यात आली आहे.
स्वातंत्र्याचे प्रतीक
काही लोकांनी अनवाणी पायांनी फिरण्याचे शारीरिक लाभ सांगण्यास सुरुवात केली आहे. तर काही जणांनी पादत्राणांशिवाय स्वातंत्र्याची अनुभूती होत असल्याचे म्हटले आहे. जगातील अत्यंत कमी देश इतके साफ-स्वच्छ आहेत की तेथे लोक अनवाणी फिरु शकतील. याचमुळे त्यांना याचा आनंद घेऊ द्यावा असेही काही जणांनी नमूद केले आहे. माणसाने सुमारे 40 हजार वर्षापूर्वी अनवाणी राहणे बंद केले होते. नंतर याला आरामदायी आणि आरोग्यदायी जीवनशैलीशी जोडून पाहिले जाऊ लागले. आता अनवाणी राहण्याचा ट्रेंड पुन्हा परतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.