For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इलेक्ट्रिक वाहनांचा वापर‘वाढता वाढता वाढे...’

11:11 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
इलेक्ट्रिक वाहनांचा वापर‘वाढता वाढता वाढे   ’
Advertisement

सरकारकडून अनुदान, परवडणारे इंधन, शून्य प्रदूषणामुळे प्रतिसाद

Advertisement

बेळगाव : इंधनाचे दर गगनाला भिडू लागल्याने पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. यापूर्वी केवळ इलेक्ट्रिक दुचाकीच रस्त्यांवरून धावताना दिसत होत्या. परंतु, आता तिचाकी, चार चाकीही विजेवर धावू लागल्या आहेत. इलेक्ट्रिक वाहने वापरण्यात बेळगावकरही अग्रेसर आहेत. मागील वर्षभरात तब्बल 4 हजार 177 इलेक्ट्रिक वाहने खरेदीची नोंद बेळगाव प्रादेशिक परिवहन विभागाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. बेळगावमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 100 रुपये 33 पैसे तर डिझेलचा दर 86 रुपये 41 पैसे इतका आहे. पेट्रोलवरील दुचाकी प्रतिलिटर 50 ते 60 किलोमीटर धावतात. याचीच तुलना इलेक्ट्रिक वाहनांशी केल्यास अत्यंत कमी पैशात ही वाहने धावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा आहे. त्यातच केंद्र व राज्य सरकारनेही इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनुदान जाहीर केल्याने वाहनांची संख्या वाढली आहे. बेळगाव प्रादेशिक परिवहन विभागाकडे मागील वर्षभरात एकूण 39 हजार 557 वाहनांची नोंद झाली आहे. त्यापैकी 4 हजार 177 वाहने इलेक्ट्रिक आहेत. बऱ्याच इलेक्ट्रिक दुचाकी नोंद न करताच वापरल्या जात असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढल्याने शहरात ठिकठिकाणी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे.

हेस्कॉमवतीने मोफत चार्जिंग

Advertisement

इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढू लागल्याने बेस्कॉम व हेस्कॉमच्यावतीने राष्ट्रीय महामार्ग तसेच शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी 40 हून अधिक इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. यासाठी मध्यंतरी अर्जदेखील मागविण्यात आले होते. इलेक्ट्रिक वाहनांसाठी हेस्कॉमने पुढाकार घेतला असून नेहरूनगर व रेल्वेस्टेशन समोरील कार्यालयामध्ये मोफत चार्जिंग स्टेशन सुरू केले आहे. या ठिकाणी दुचाकी वाहनाला मोफत चार्जिंग करून दिले जाते. चार्जिंग स्टेशनची क्षमता कमी असल्याने सध्या धिमा प्रतिसाद असला तरी भविष्यात या दोन्ही ठिकाणी वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

परिवहन मंडळ आघाडीवर

काही दिवसातच परिवहन मंडळाच्या ताफ्यात 50 हून अधिक इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. यासाठीच परिवहन मंडळाने इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी हेस्कॉमकडे परवानगी मागितली आहे. शिवाजीनगर येथील बस डेपो क्र. 3 मध्ये 3 हजार केव्हीए व 2 हजार 500 केव्हीए क्षमतेचे दोन चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. चार्जिंग स्टेशन्सच्या अंतिम मंजुरीसाठी हुबळीतील कार्यालयाला अर्ज केला आहे. मंजुरी मिळताच बेळगावमध्ये परिवहन मंडळाचे स्वतंत्र चार्जिंग स्टेशन होणार आहे.

येथे आहेत इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स

  • हेस्कॉम कार्यालय, रेल्वेस्टेशन
  • हेस्कॉम कार्यालय, नेहरूनगर
  • हॉटेल रामदेव, नेहरूनगर
  • हॉटेल मॅरिएट, काकती
  • हॉटेल पै रिसॉर्ट, किल्ला तलाव
  • हॉटेल युके-27, अयोध्यानगर (प्रस्तावित)
  • रिलायन्स मॉल- बॉक्साईट रोड (प्रस्तावित)

इलेक्ट्रिक वाहनांना पाठबळ

शहरात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. केंद्र तसेच राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना पाठबळ दिल्याने इलेक्ट्रिक वाहने वाढली आहेत. प्रदूषणाचा विचार करता इलेक्ट्रिक वाहने फायदेशीर ठरत आहेत. शहरात चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठीचे अनेक प्रस्ताव हेस्कॉमकडे आले असून टप्प्याटप्प्याने त्यांना मंजुरी दिली जात आहे.

- ए. एम. शिंदे (साहाय्यक कार्यकारी अभियंता, हेस्कॉम)

Advertisement
Tags :

.