For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता मद्यपी वाहनचालकांवर कारवाईचा बडगा

11:26 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
आता मद्यपी वाहनचालकांवर कारवाईचा बडगा
Advertisement

दोन दिवसात 42 जणांना दणका : वाहतूक पोलिसांकडून तपासणी:  व्हर्च्युअल कोर्टच्या माध्यमातून दंड भरण्याची प्रक्रिया

Advertisement

बेळगाव : वर्दीच्या रिक्षाचालकांविरुद्ध कारवाईनंतर वाहतूक पोलिसांनी दोन दिवस नशेत वाहने चालविणाऱ्यांविरुद्ध मोहीम राबविली आहे. शनिवार व रविवारी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी नशेत वाहने चालविणाऱ्या 42 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सायंकाळपासून रविवारी रात्रीपर्यंत वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही मोहीम राबवली आहे. अधूनमधून नशेत वाहने चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा सपाटा सुरू केला जातो. एकदा वाहतूक पोलिसांच्या तावडीत सापडले की दंडाची रक्कमही मोठी आहे. यापूर्वी दंड भरण्यासाठी न्यायालयात जावे लागत होते. आता व्हर्च्युअल कोर्टच्या माध्यमातून दंड भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

वाहतूक दक्षिण विभाग पोलिसांनी 20 जणांविरुद्ध तर उत्तर विभाग पोलिसांनी 22 जणांविरुद्ध अशा एकूण 42 वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. व्हर्च्युअल कोर्टच्या माध्यमातून चालणाऱ्या प्रक्रियेत नशेत वाहन चालविणाऱ्या वाहनचालकाचा मोबाईल क्रमांक त्या अॅपमध्ये एंट्री केला की संबंधितांना दंड भरण्यासंदर्भात मेसेज येतो. त्यांची इच्छा असेल तर त्या अॅपच्या माध्यमातूनच दंड भरता येतो. यासाठी 20 दिवसांची मुदत असते. दंड भरेपर्यंत वाहन वाहतूक पोलिसांच्या ताब्यात असते. दंड भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधितांची वाहने सोडली जातात. शनिवार विकेंड असतो. त्यामुळे अनेक जण घरी जाताना एखादी रंगीत पार्टी करून निघतात. अचानक सुरू होणाऱ्या तपासणी मोहिमेमुळे ते सहजपणे वाहतूक पोलिसांच्या जाळ्यात अडकतात. ही मोहीम खासकरून विकेंडवेळी सुरूच ठेवणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.