अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहात क्वाड विधेयक संमत
सदस्य देशांसोबत संबंध मजबूत करण्यावर जोर : भारत क्वाडचा महत्त्वाचा हिस्सा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहाने क्वाड विधेयक संमत केले आहे. हे विधेयक 39 विरुद्ध 379 मतांनी संमत झाले आहे. या विधेयकात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपान यांच्यात घनिष्ठ सहकार्यासाठी अध्यक्ष जो बिडेन यांच्या प्रशासनाला क्वाड आंतर-संसदीय कार्यगट स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
‘मजबूत अमेरिका-ऑस्ट्रेलिया-भारत-जपान-सहकार्य’ किंवा चतुष्पक्षीय सुरक्षा संवाद (क्वाड) विधेयकात चारही देशांदरम्यान संयुक्त सहकार्याला मजबूत करण्याचा मुद्दा सामील आहे. या विधेयकाने अधिनियमाचे स्वरुप धारण केल्याच्या 180 दिवसांच्या आत क्वाडसोबतचे कामकाज आणि सहकार्य वाढविण्याची रणनीती काँग्रेसला सादर करण्यात यावी आणि आंतर-संसदीय कार्यगट स्थापन करण्यासाठी जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारतासोबत चर्चा करावी असा निर्देश विदेश मंत्रालयाला देण्यात आला आहे.
दोन खासदारांनी टाळले मतदान
कार्यगटात अमेरिकेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एका अमेरिकन समुहाची स्थापना केली जाणार आहे, ज्यात काँग्रेसचे कमाल 24 सदस्य सामील असणार आहेत. हा कार्यगट वार्षिक बैठका आणि समूह नेतृत्वासाठी दिशानिर्देश ठरविणार आहे. या समुहाला काँग्रेसच्या विदेश विषयक समित्यांना एक वार्षिक अहवाल सादर करावा लागणार असल्याचे या विधेयकात नमूद आहे. डेमोक्रेटिक पार्टीच्या दोन खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केले आहे. यात मिनियापोलीसच्या खासदार इल्हान उमर यांचा समावेश आहे.
संसदेला रणनीतिविषयी माहिती द्यावी लागणार
खासदार ग्रेगरी मीक्स यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या या विधेयकात विदेश मंत्रालयाला क्वाडसोबत कामकाज आणि सहकार्य मजबूत करण्याच्या रणनीतिविषयी काँग्रेसच्ला माहिती द्यावी लागणार असल्याचे म्हटले गेले आहे. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारतादरम्यान चतुष्पक्षीय सुरक्षा चर्चा एक स्वतंत्र आणि खुल्या हिंद-प्रशांत क्षेत्राला चालना देणे आणि क्षेत्रातील अमेरिकेच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असल्याचे मीक्स यांनी म्हटले आहे.