द.आफ्रिका, न्यूझीलंड संघांच्या नव्या जर्सीचे अनावरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विंडीज आणि अमेरिका यांच्या संयुक्त यजमानपदाने 1 जूनपासून सुरु होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडूंसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या जर्सीचे अधिकृत अनावरण करण्यात आले.
या अनावरणप्रसंगी क्रिकेट न्यूझीलंडच्या एका पदाधिकाऱ्याचे या नव्या जर्सीसमवेत काढलेले छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंना या स्पर्धेसाठी देण्यात येणाऱ्या क्रिकेट किट समवेत या नव्या जर्सीचाही समावेश राहिल. क्रिकेट न्यूझीलंडच्या कार्यालयामध्ये मंगळवारपासून ही नवी जर्सी उपलब्ध राहिल, अशी माहिती क्रिकेट न्यूझीलंडच्या प्रवक्त्याने दिली आहे. न्यूझीलंड संघातील मार्क चॅपमन, जेम्स नीशम, सोधी आणि साऊदी या खेळाडूंची नव्या जर्सी समवेत छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. 2021 साली संयुक्त अरब अमिरात येथे झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंड संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. पण अंतिम लढतीत त्यांना ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली होती.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेतर्फे रविवारी आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी खास तयार करण्यात आलेल्या आकर्षक रंगीत जर्सीचे अनावरण करण्यात आले. ही नवी जर्सी पिवळ्या रंगाची असून त्यावर दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय ध्वजाचे चित्र राहिल. तसेच या जर्सीवर दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय फुलाचेही चित्र आहे