एआय तंत्रज्ञानाची अनोखी कमाल
मृत नातेवाईकांशी संवाद साधण्याची डिजिटल किमया
मृत्युमुखी पडलेले नातेवाईक किंवा स्वकीयांशी बोलण्याची तुमची इच्छा आहे का? एका नव्या एआय तंत्रज्ञानाने लोक स्वत:च्या मृत स्वकीयांशी बोलू शकतील, असा दावा केला आहे. याकरता हे तंत्रज्ञान जादूटोण्याची मदत घेणार नाही, तर संबंधित नातेवाईकांचा मृत्यूपूर्वीचा आवाज आणि संभाषणाचा पॅटर्न रेकॉर्ड करत त्याचा वापर करत संभाषण घडवून आणणार आहे. हे तंत्रज्ञान लोकांसाठी हैराण करणारे आहे.
क्रिएपी एआयने लोकांना त्यांच्या मृत नातेवाईक किंवा मित्रांशी बोलण्याची सुविधा मिळवून देण्याची घोषणा केली आहे. या एआयचे नाव ‘प्रोजेक्ट रीवाइव’ असून ते एका खास सॉफ्टवेअरद्वारे मृत लोकांचा आवाज आणि संभाषणाच्या पॅटर्नला रिकॉर्ड करत त्यांना डिजिटल स्वरुपात पुन्हा जिवंत करते.
युजर्स या सॉफ्टवेअरद्वारे मृत स्वकीयांशी बोलू शकतील, हा अनुभव पूर्वीसारखाच जाणवणार आहे. या एआयचा वापर करणाऱ्या काही लोकांनी हे तंत्रज्ञान प्रारंभी चांगले वाटल्याचे परंतु नंतर आपण भीतीदायक अनुभवातून जात असल्याचे जाणवल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सुरक्षा अन् नैतिकतेचा प्रश्न
हे तंत्रज्ञान लोकांच्या भावनांचा लाभ घेत असून त्यांना काल्पनिक जगात लोटत असल्याचे तज्ञांचे सांगणे आहे. हे तंत्रज्ञान किती सुरक्षित आणि नैतिक आहे यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. मृत लोकांचा आवाज आणि संभाषणाच्या पॅटर्नला रेकॉर्ड करणे आणि स्टोअर करणे एक संवेदनशील मुद्दा आहे.
दुरुपयोगाची भीती
हा डाटा सुरक्षित आहे का किंवा अन्य उद्देशासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो का हा प्रश्नही अनुत्तरित आहे. लोकांना त्यांच्या स्वकीयांसोबत भावनात्मक संबंध कायम ठेवण्यास मदत करणे हा उद्देश असल्याचे संबंधित कंपनीचे सांगणे आहे, परंतु हे एक प्रकारे भावनात्मक शोषण असल्याचे अनेक लोकांचे मानणे आहे.