केंद्रीय मंत्र्यांनी स्वीकारला पदभार
अमित शहा, एस. जयशंकर, ज्योतिरादित्य सिंदिया, भूपेंद्र यादव आदींकडून कार्यारंभ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अनेक नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांनी पदभार स्वीकारुन कामाला प्रारंभ केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, ऊर्जा मंत्री जगतप्रकाश नड्डा आदी मंत्र्यांनी त्यांच्या कार्यालयांमध्ये जाऊन संबंधित विभागांचे उत्तरदायित्व स्वीकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनानुसार काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांचा शपथविधी 9 जून या दिवशी झाला होता.
गेल्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा शपथबद्ध झाले आहेत. त्यांनी यासंदर्भात भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या विक्रमाशी साधर्म्य साधले आहे. त्यांच्यासह एकंदर 72 मंत्र्यांचा शपथविधीही रविवारी पार पडला होता. यावेळी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नसले तरी, राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पूर्ण बहुमत प्राप्त आहे.
पोलीस स्मारकाला भेट
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पदाचा भार स्वीकारण्यापूर्वी दिल्लीच्या चाणक्यपुरी भागात असणाऱ्या पोलीस स्मारकाला भेट दिली. शहा यांना सलग दुसऱ्यांदा देशाचे गृहमंत्री बनविण्यात आले असून सहकार विभागही त्यांच्याकडेच ठेवण्यात आला आहे. नव्याने निर्माण करण्यात आलेली भारतीय न्याय संहिता प्रभावीपणे लागू करणे ही आपली प्राथमिकता असेल, असे शहा यांनी स्पष्ट केले. गृहविभागाच्या कार्यालयात शहा यांच्या स्वागताला विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रभावी मंत्री म्हणून शहा यांचा परिचय आहे.
पाक-चीन संबंधांचे आव्हान
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनीही आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. पाकिस्तान आणि चीन या दोन देशांशी संबंध कसे असावेत हे निर्धारित करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. ते सलग दुसऱ्यांदा या पदाचा कार्यभार स्वीकारत असून त्यांच्या प्रथम कार्यकाळात भारताचे अमेरिकेशी असलेले संबंध अधिक दृढ झाले होते. रशियाशी असलेले पारंपरिक संबंध प्रभावित होऊ न देता अमेरिकेशी जवळीक साधण्याची किमया त्यांनी करुन दाखविली आहे. गेल्या 4 वर्षांपासून तणावाचे वातावरण असून दोन्ही देशांच्या सेना लडाखच्या सीमेवर एकमेकींसमोर उभ्या आहेत. भारतात दहशतवाद माजविण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न अद्यापही सुरुच असून भारताचे प्रत्युत्तर महत्वाचे ठरणार आहे. पाकिस्तानच्या दहशतवादाला जागतिक पातळीवर प्रखर विरोध करण्याचे धोरण पुढेही लागू ठेवण्यात येईल, असे जयशंकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
विकासात दूरसंचार क्षेत्र महत्त्वाचे
नवे दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनीही पदभार स्वीकारला आहे. देशाच्या विकासात दूरसंचार आणि इंडिया पोस्ट यांची भूमिका महत्त्वाची आहे. आपल्या कार्यकाळात या क्षेत्रांचा अधिक विकास करण्याचा आपण प्रयत्न करु. तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात मोबाईल नेटवर्क आणि इतर सुविधा पसरविण्याच्या प्रयत्नांना प्राधान्य देण्यात येईल. याच विभागात आपण 2007 ते 2009 काळात कनिष्ठ मंत्री म्हणून काम केले आहे. आज या विभागाचे कॅबिनेट मंत्रिपद मला मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे भारतात दूरसंचार क्रांती झाली. ही क्रांती अधिकाधिक व्यापक करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच ग्राहकांना भेडसाविणाऱ्या समस्या त्वरित सोडविणे हे माझे प्रथम कर्तव्य असेल. समयबद्ध प्रकल्पपूर्ती हे माझे ध्येय असेल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
‘एक पेड माँ के नाम’
पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनीही पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी हा महत्त्वाचा विभाग माझ्या हाती देऊन मोठे उत्तरदायित्व दिले आहे. पर्यावरण संरक्षण हे भारताच्या भविष्याशी निगडीत आहे. पर्यावरण सांभाळतानाच विकासाच्या गतीवर परिणाम होऊ न देण्याचे दुहेरी आव्हान सरकारसमोर आहे. वृक्षलागवड आणि वृक्षसंगोपनावर मोठा भर द्यावा लागणार आहे. ‘एक पेड माँ के नाम’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनव योजनेचे प्रभावी क्रियान्वयन करणे हे माझे ध्येय असेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अन्य अनेक मंत्र्यांकडून कार्यारंभ
निर्मला सीतारामन, नितीन गडकरी, प्रल्हाद जोशी, रामनाथ ठाकूर, राजनाथसिंग, अनेक राज्यमंत्री आणि स्वतंत्र पदभार असणाऱ्या राज्यमंत्र्यांनीही त्यांच्या संबंधित पदांची सूत्रे हाती घेतली असून कामाला प्रारंभ केला आहे. येत्या 100 दिवसांमध्ये सर्व मंत्र्यांनी त्यांच्याशी संबंधित विभागांमधील प्रलंबित कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारीच केले आहे.