पृथ्वीवरचा ‘पाताळ’लोक
स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या शब्दांचा आपल्याला परिचय आहे. पुराण कथांमधून ही तीन स्थाने आपल्या कानावर पडलेली असतात. यापैकी पृथ्वीवर आपण प्रत्यक्ष वास्तव्यच करीत असल्याने तिचा नव्याने परिचय होण्याचा प्रश्न नसतो. स्वर्ग आणि पाताळ मात्र कोणालाही जिवंतपणी पहावयास मिळत नाहीत.
तथापि, प्रत्यक्ष पृथ्वीवरच एक ‘पाताळ’लोक आहे, असे कोणी म्हटले तर आपला कदाचित विश्वास बसणार नाही. हा पाताळलोक चीनमध्ये आहे, हे समजल्यावर तर आपल्या मनात अनेक शंका आणि संशय निर्माण होऊ शकतात. पण खरोखरच असा एक पाताळलोक चीनमध्ये आहे. चीनच्या उत्तर भागात बेयिंग नामक गाव आहे. हेच गाव पृथ्वीवरचा पाताळलोक म्हणून प्रसिद्ध आहे. कारण येथील लोकांची घरे भूमीच्या खाली पृथ्वीच्या उदरात आहेत. वरुन पाहिले, तर येथे कोणतेही गाव नसून केवळ रिकामे मैदान आहे, असा पर्यटकांना भास होतो. एकाही घराचे छतही दिसून येत नाही. पण प्रत्यक्ष या गावात पाय ठेवल्यानंतरच या पाताळाचा अनुभव घेता येतो. वरुन दिसणाऱ्या या रिकाम्या मैदानाच्या खाली शेकडो घरे आहेत. या घरांमध्ये जाण्यासाठी भुयारे खोदलेली आहेत. अशा घरांना चीनमध्ये डिकेमयुआन अशी संज्ञा आहे. या शब्दाचा अर्थ ख•dयातील अंगण असा आहे. या गावातील सर्व घरे भूमीखालच्या गुहांसारखी वाटतात.
या गावाच्या या वैशिष्ट्यामुळे ते जगभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे स्थळ बनले आहे. प्रतिवर्ष हे गाव पाहण्यासाठी सहस्रावधी पर्यटक येत असतात. ते एक दोन-दिवस येथील घररुपी भूमीगत गुहांमध्ये वास्तव्य करतात. येथे त्यांच्या खाण्यापिण्याची योग्य ती सोय केली जाते. या पर्यटकांमुळे गावतील लोकांसाठी उत्पन्नाचे एक महत्वाचे साधन निर्माण झाले आहे. त्यामुळे हे वैशिष्ट्या एक मोठे आर्थिक साधन म्हणूनही प्रकाशात आलेले आहे. उत्तर चीनच्या प्रशासनानेही येथे पर्यटकांची संख्या वाढावी म्हणून विविध सोयी केलेल्या आहेत.