लक्ष विचलित करून दागिने पळविणाऱ्या चौघांच्या टोळीच्या आवळल्या मुसक्या
10 लाखांचे दागिने जप्त : कित्तूर पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
वृद्धेचे लक्ष विचलित करून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने पळविणाऱ्या टोळीतील अल्पवयीन मुलासह चौघा जणांना कित्तूर पोलिसांनी अटक केली आहे. या चौकडीने एकूण पाच गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याजवळून 10 लाख 10 हजार रुपये किमतीचे 101 ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.
मारुती आप्पय्या डंगी (वय 36) राहणार मल्लापूर पी. जी.-घटप्रभा, सचिन पुंडलिक चौडक्कन्नावर (वय 20) मूळचा राहणार मुरगोड, सध्या राहणार संकेश्वर, प्रल्हाद कलंदर महिलांदे (वय 20) मूळचा धुपदाळ, सध्या राहणार संकेश्वर अशी तिघा जणांची नावे आहेत. त्यांच्याबरोबर एका अल्पवयीनालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यासाठी वापरलेले वाहनही जप्त केले आहे.
बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक डॉ. वीरय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली कित्तूरचे पोलीस निरीक्षक शिवानंद गुडगनट्टी, बैलहोंगलचे पोलीस निरीक्षक प्रमोद यलीगार, कित्तूरचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ, बैलहोंगलचे पोलीस उपनिरीक्षक गुरुराज कलबुर्गी, नेसरगीचे पोलीस उपनिरीक्षक चाँदबी गंगावती व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. तांत्रिक विभागाचीही यासाठी मदत घेण्यात आली आहे.
29 नोव्हेंबर रोजी बसापूर, ता. कित्तूर येथील सीतव्वा सन्नगौडा पाटील (वय 72) ही वृद्धा दुपारी होंडद बसवण्णा मंदिरापर्यंत वॉकिंगसाठी गेली होती. बसापूरहून कित्तूरला जाणाऱ्या रोडवर हे मंदिर आहे. मंदिराच्या कट्ट्यावर थोडा वेळ बसून सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास ती पुन्हा बसापूरकडे निघाली होती. त्यावेळी मोटारसायकलवरून दोघेजण तेथे आले. पाठीमागे बसलेल्या तरुणाने सीतव्वाजवळ येऊन येथे महादेव मंदिर कोठे आहे, अशी विचारणा केली. या परिसरात महादेव मंदिर नाही, असे सीतव्वाने सांगितल्यानंतर मोटारसायकलवरून आलेले दोघे बसापूरच्या दिशेने निघून गेले. थोड्या वेळात हे दोघे पुन्हा सीतव्वाजवळ आले. आपल्या मोबाईलमध्ये एका मंदिराचा फोटो दाखवला. महादेव मंदिर हेच आहे का बघा, असे सांगितले. त्यावेळी मोबाईलमधील फोटो बघण्यात सीतव्वा मग्न असताना तिच्या गळ्यातील 12 ग्रॅमचा पोहे हार हिसकावून घेऊन ते दोघे फरारी झाले.