पाकिस्तानातील धुमश्चक्री
भारताच्या शेजारी असणाऱ्या पाकिस्तान या देशात सध्या बऱ्याच घडामोडी होत आहेत, असे दिसून येत आहे. या देशाचे नेहमीच भारताशी शत्रुत्व राहिलेले असून तो भारताला विनाकारण त्रास देण्याची एकही संधी सोडत नाही. तथापि, भारताच्या विरोधात केलेले प्रत्येक कारस्थान याच देशावर ‘बुमरँग’प्रमाणे उलटलेले आहे. सध्या पाकिस्तानात तेथील सेनादलांचे प्रमुख ‘फिल्ड मार्शल’ असीम मुनीर आणि त्या देशाचे लोकनियुक्त नेते शहबाझ शरीफ यांच्यात एक प्रकारचे शीतयुद्ध होत आहे. तसेच या देशाचा माजी नेता इम्रानखान याची स्थिती काय आहे, या विषयाचीही चर्चा होत आहे. नुकतीच पाकिस्तान संसदेने त्या देशातील 27 वी घटनादुरुस्ती करुन सेनाप्रमुख मुनीर यांना अनिर्बंध अधिकार दिले आहेत. ते एखाद्या हुकुमशहालाही लाजवतील अशा प्रकारचे आहेत. यामुळे मुनीर त्यांची इच्छा असेपर्यंत पाकिस्तानच्या तीन्ही सेनादलांचे अधिपती राहू शकतात. त्यांच्या विरोधात पाकिस्तानातील कोणत्याही न्यायालयात कोणताही अभियोग चालविला जाऊ शकणार नाही. तसेच कोणत्याही प्रकरणात त्यांची चौकशीही पेली जाऊ शकणार नाही. इतकेच नव्हे, तर त्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नियुक्त करणे, त्यांच्या बदल्या करणे किंवा त्यांना काढून टाकणे हे अधिकारही मुनीर यांना मिळाले आहेत. एकप्रकारे, सारा पाकिस्तानच त्यांच्या आधीन करण्यात आला आहे. तथापि, या देशाचे सध्याचे लोकनियुक्त नेते शहाबाझ शरीफ यांनी या घटनादुरुस्तीची नोंद प्रशासकीय परिपत्रकात अद्याप न केल्याने मुनीर यांचे अधिकार अधांतरी लटकलेले आहेत. घटनादुरुस्तीची परिपत्रकात नोंद न करताच शरीफ प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पुढे करत वैद्यकीय उपचारांसाठी लंडनला निघून गेले. काही दिवसांनी ते परत आले पण त्यांनी अद्यापही मुनीर यांना अधिकार दिलेले नाहीत. त्यांना एवढे अमर्याद अधिकार देण्यास खरेतर पाकिस्तानातील सत्ताधारी राजकीय पक्ष राजी नव्हते. तथापि, पाकिस्तानात लोकशाहीचे केवळ नाटक चालते. खरी सत्ता तेथील सेनेच्याच हाती असते आणि सेनाप्रमुख केव्हाही निवडून आलेले सरकार रद्द करुन देश आपल्या हाती घेऊ शकतात. असे त्या देशात अनेकवेळा घडलेले आहे. सध्याही जवळपास हीच स्थिती निर्माण होऊ घातली आहे. त्यामुळे घटनादुरुस्ती झाली तरी अद्याप मुनीर यांच्या हाती त्यांना हवे असणारे अधिकार अधिकृतरित्या आलेलेच नाहीत. ही स्थिती आणखी काही काळ ताणली गेली, तर तेथील लोकनियुक्त सरकारची गठडी वळून मुनीर स्वत:च्या हाती थेटपणे देशाची सूत्रे घेण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. एकाबाजूला हे घडत असताना, माजी आणि सध्या कारागृहात असलेले नेते इम्रान खान यांचा कारागृहात छळामुळे मृत्यू झाल्याच्या काही दिवसांपूर्वी पसरलेल्या वृत्ताचे पडसाद आजही उमटत आहेत. इस्रान खान यांची सुटका करण्यात आली नाही, तर कारागृह फोडून त्यांना बाहेर काढण्यात येईल, अशी धमकी त्यांच्या समर्थकांनी दिली आहे. खान यांच्या एका बहिणीला तीन दिवसांपूर्वी कारागृहात त्यांची भेट घेण्याची अनुमती देण्यात आली होती. ते जिवंत असून त्यांची प्रकृती ठीक आहे. पण त्यांचा प्रचंड मानसिक छळ होत आहे, असे त्यांच्या बहिणीने त्यांना भेटून बाहेर आल्यानंतर स्पष्ट केले. तथापि, पाकिस्तानातीलच अनेकांचा यावर विश्वास नाही. इम्रान खान यांचे कारागृहात काहीतरी बरेवाईट करण्यात आलेले आहे, असेच अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आगामी काळात त्यांच्या सुटकेसाठी भव्य मोर्चा आयोजित केला असून त्यांना प्रत्यक्ष समोर आणले जाईपर्यंत देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. इम्रान खान यांची आजही टिकून असलेली लोकप्रियता पाहता पाकिस्तानात काहीतरी मोठे घडू शकते, असे बोलले जाते. तिसऱ्या बाजूला पाकिस्तानातून फुटून निघण्याची महत्वाकांक्षा असलेले बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा या प्रांतामधील बंडखोर सातत्याने पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ले करीत आहेत. त्यामुळे तेथे लक्ष देणे पाकिस्तानच्या सैन्याला भाग पडत आहे. या सर्व परिस्थितीत भर प्रचंड आणि असह्या ठरणारी महागाई तसेच बेरोजगारी यांची पडत आहे. जीवनावश्यक वस्तूंचेही दर गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्य जनता कमालीची त्रस्त आहे. परिणामी, जनक्षोभाचा स्फोट केव्हाही घडू शकतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशा अत्यंत अस्थिर आणि विस्कळीत स्थितीचा लाभ धर्मांध आणि हिंसावादी दहशतवादी संघटनांकडून घेतला जात असून त्या बळकट होण्याचा प्रयत्न करीत आहेत. असह्या परिस्थितीमुळे असहाय्य आणि निराश झालेले युवक दहशतवादाकडे झपाट्याने वळत आहेत, असे तेथील वृत्तांवरुन समजून येते. दहशतवाद हा पाकिस्तानात आधीपासूनच प्रबळ आहे. त्यात अशा परिस्थितीमुळे त्याची शक्ती अधिक वाढल्यास आश्चर्य नाही. भारतालाही पाकिस्तानातील या स्थितीचा गांभीर्याने विचार करावा लागतो. कारण, पाकिस्तानात अशी स्थिती निर्माण झाली, की भारताच्या कुरापती त्या देशाकडून अधिक जोमाने काढल्या जातात. भारताशी युद्ध किंवा सशस्त्र संघर्ष छेडून पाकिस्तानच्या जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न आजवर अनेकदा त्या देशाने केला आहे. त्यामुळे भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाईल. दिल्लीत नुकतीच कारबाँबस्फोटाची घटना घडली आहे. तिचेही पाकिस्तानशी ‘कनेक्शन’ आहे, असे आरोप केले जात आहेत. मुनीर यांच्या विरोधातही पाकिस्तानात विरोध प्रचंड प्रमाणात वाढीला लागला असून त्यामुळे ते स्वत:चे आसन बळकट करण्यासाठी भारताशी युद्ध करु इच्छितात. पहलगामचा दहशतवादी हल्ला याचसाठी मुनीर यांच्याकडूनच घडविण्यात आला होता, असा आरोप इम्रान खान यांच्या बहिणीने केला आहे. याचाच अर्थ असा, की भारतालाही सावध रहावे लागणार असून आपल्या सुरक्षेकरीता युद्धसज्ज असावे लागणार आहे. कारण, अस्थिर पाकिस्तान नेहमीच भारतासाठी धोकादायक असतो. सध्यातर तेथे अस्थिरता आणि अनिश्चितता यांचा कळसाध्याय सुरु आहे. अर्थात, याची जाणीव भारतातल्या सरकारला आहेच. त्यामुळे पाकिस्तानने कोणतेही दु:साहस केल्यास त्या देशाला त्याची पुरेपूर किंमत भोगावी लागेल, याची निश्चिती भारत करेलच.