डोळ्यांवर पट्टी बांधून खाण्याचा ट्रेंड
स्वीत्झर्लंडच्या रेस्टॉरंटमधील अनोखा प्रकार
सद्यकाळात खाणे केवळ स्वादाची बाब राहिलेली नाही, लोक प्रथम छायाचित्रे काढून घेतात आणि मग खातात. इन्स्टाग्रामवर प्रत्येक डिशला परफेक्ट दाखविण्याची चढाओढ सुरू झाली आहे. परंतु काही लोक खाद्यपदार्थांना स्पर्श करण्यापूर्वी त्याचे ‘एस्थेटिक’ छायाचित्र काढणे गरजेचे मानतात. जगात अशी अनेक रेस्टॉरंट्स आहेत, जेथे तुम्ही पूर्णपणे काळोखात किंवा डोळ्यांवर पट्टी बांधून खाता आणि या अद्भूत संकल्पनेला ‘डार्क डायनिंग’ म्हटले जाते. स्वीत्झर्लंडच्या झ्यूरिचमध्ये ‘ब्लाइंडेकुह’ रेस्टॉरंटमध्ये याच अनोख्या धारणेवर काम केले जाते. येथे खाणारे लोक पूर्णपणे काळोखात बसतात, तेथे किंचितही प्रकाश नसतो. काही वेगळे दाखविणे नाही तर ज्यांच्याकडे दृष्टी नसते, त्यांचे जग कसे असते याची जाणीव करून देणे हा यामागील उद्देश आहे.
डार्क डायनिंगची सुरुवात
या संकल्पनेची सुरुवात 1990 च्या दशकाच्या अखेरीस युरोपमध्ये झाली होती. सर्वप्रथम 1997 मध्ये पॅरिसमध्ये ‘ले गोट डू नोयर’ नावाचा एक प्रयोग झाला, जेथे लोकांना अंधारात बसून खाण्याचा आनंद घेतला. यानंतर झ्यूरिचमध्ये पहिले स्थायी रेस्टॉरंट ब्लाइंडेकुह सुरू झाले. हे रेस्टॉरंट दृष्टीहीन पाद्री जर्ग स्पीलमॅन आणि त्यांचे सहकारी स्टीफन जप्पा यांच्या कल्पनेतील होते. लोकांनी काही तास प्रकाशाशिवाय घालवून दृष्टीबाधित लोक कशाप्रकारे जग अनुभवतात, हे जाणून घ्यावे अशी त्यांची इच्छा होती.
न पाहता खाण्याचा अनुभव
येथे येणारे लोक स्वत:च्या पसंतीनुसार केवळ शाकाहारी का मांसाहारी खायचे हे सांगू शकतात. यानंतर प्लेटमध्ये काय येणार याचा अंदाजही त्यांना नसतो. रेस्टॉरंटच्या आत मोबाइल किंवा कुठल्याही प्रकारचा प्रकाश नेण्यास मनाई आहे. ग्राहक परस्परांच्या खांद्यावर हात ठेवून रांगेत चालत आत जातात. वेटर त्यांना सीटपर्यंत पोहोचवितो आणि त्यांची प्लेट आणि ग्लास कुठे आहेत हे सांगतो.
स्वादाचा नवा अनुभव
डोळे बंद असतात, तेव्हा अन्य इंद्रिये तीव्र होतात, तुम्ही जेवणाचा गंध, स्वरुप आणि स्वादाला पूर्वीपेक्षा अधिक जाणवू शकता. वाइनचा गंध, सॉसचा फ्लेवर किंवा एखाद्या डिशमध्ये मसाल्यांचा सौम्य गंधही अधिक प्रमाणात जाणवतो असे लोकांचे सांगणे आहे. डार्क डायनिंग केवळ युरोपपुरती मर्यादित नाही, सिंगापूर, लंडन, पॅरिस, अॅमस्टरडॅम, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांमध्येही अशाप्रकारची रेस्टॉरंट सुरू झाली आहेत. भारतात सक्षम ट्रस्टने ‘नाइट ऑफ द सेंसेस’ कार्यक्रम आयोजित केला होता.