For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जंगलात प्रभावी ठरतोय ट्रॅप कॅमेरा...वन्य प्राण्याचे अस्तित्व होते स्पष्ट

02:24 PM Mar 21, 2024 IST | Abhijeet Khandekar
जंगलात प्रभावी ठरतोय ट्रॅप कॅमेरा   वन्य प्राण्याचे अस्तित्व होते स्पष्ट
Trap Camera
Advertisement

कोल्हापुरातील जंगलात 160 कॅमेरे :  आंतरराष्ट्रीय वन दिन विशेष

सुधाकर काशीद कोल्हापूर

राजस्थानातील व्याघ्र प्रकल्पात काही वर्षांपूर्वी एक घटना घडली होती, या व्याघ्र प्रकल्पात नेमके वाघ किती, हे कोणालाच सांगता येत नव्हते. प्रत्येक जण वेगवेगळे आकडे सांगून व्याघ्र प्रकल्पात भरपूर वाघ आहेत, असे भासवत होता. पण काही दिवसांनी हे बिंग फुटले व केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच वाघ या परिसरात असल्याचे स्पष्ट झाले. याला कारण म्हणजे, त्यावेळी वाघाच्या अस्तित्वाबद्दल अगदी ठोस पुरावा सिद्ध करण्यात अनेक त्रुटी होत्या. त्यामुळे ‘मला वाघ दिसला’ हे कोणीही उठून सांगू शकत होता. त्यामुळे वाघाची संख्या काही कागदावर आपोआपच वाढत होती.

Advertisement

वाघाच्या किंवा वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाबद्दल बऱ्यापैकी ठोस पुरावा मिळावा म्हणून जंगलात ट्रॅप कॅमेरे लावण्यात वन विभागाने हळूहळू सुरुवात केली आणि शंभर टक्के नाही, पण जी माहिती मिळेल ती माहिती ट्रॅप कॅमेऱ्यात पकडणे शक्य झाले. वाघ, अस्वल, हत्ती किंवा कॅमेऱ्याच्या टप्प्यात जो जो प्राणी येईल, त्याचे अस्तित्व फोटोतून आणि आता नव्या तंत्रज्ञानामुळे काही क्षणाच्या व्हिडिओतून अगदी स्पष्ट दिसू लागले आहे. कोल्हापूर परिसरातील जंगलांचा विचार करता जंगलातील विशिष्ट ठिकाणी 160 हून अधिक ट्रॅप कॅमेरे आपले काम खूप चोखपणे करत आहेत. या कॅमेऱ्यामुळेच राधानगरी परिसरातील पट्टेरी वाघांचे अस्तित्व अधिक स्पष्ट होऊ शकले आहे.

ट्रॅप कॅमेरे संपूर्ण जंगलभर लावले जात नाहीत, पण जेथे पाणवठे आहेत किंवा जनावरांची वहिवाट आहे तेथे ट्रॅप कॅमेरे एका विशिष्ट उंचीवर झाडांना बांधले जातात. हे कॅमेरे ऑटोमॅटिक असतात. त्याच्या समोरून एखादे जनावर गेले की अवघ्या तीन सेकंदात ते कार्यान्वित होतात, फोटो टिपतात व काही क्षणाचा व्हिडिओही घेतात. हे कॅमेरे अद्ययावत सुविधा असलेले आहेत. जिह्यातील 160 ट्रॅप कॅमेरे खूप ताकतीचे आहेत. त्यात अगदी स्पष्ट फोटो येतात. केवळ प्राणीच नव्हे तर जंगलात शिकार किंवा अन्य कारणासाठी घुसलेले लोक कॅमेरे समोरून गेले तरी त्यांचे स्पष्ट फोटो येतात. पुढील चौकशीच्या कामात हे फोटो महत्त्वाचा पुरावा ठरतात.

Advertisement

जंगलात लावलेले कॅमेरे समोरासमोर असतात. वन्यप्राण्यांचे अस्तित्व दोन्ही बाजूंनी स्पष्ट दिसते. लागोपाठ तीन फोटो त्यात निघतात. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाचा ठोस पुरावा मिळतो. काही वेळा तरस, लांडगा कोल्हा हे प्राणी गावाजवळ येऊन पाळीव जनावरांवर हल्ला करतात. लोकांना पहिल्यांदा वाघ किंवा बिबट्या असल्याची शंका येते. पण जेथे वारंवार पाळीव प्राण्यावर हल्ले होतात अशा भागात वन विभाग ट्रॅप कॅमेरा लावतो. त्यात पाळीव प्राण्यावर नेमका कोणता प्राणी हल्ला करतो हे कळू शकते भीतीचे वातावरण त्यामुळे कमी होते. किंवा वाघ बिबट्याचा वावर कॅमेऱ्यात स्पष्ट झाला तर खबरदारी घेता येते.

कॅमेऱ्यात चित्रबद्द झालेल्या प्रत्येक वाघाचे वेगळेपण कॅमेऱ्यातील यंत्रणेद्वारे निश्चित करता येते. एकच वाघ पाच-सहा कॅमेऱ्यांत दिसला तर पाच-सहा वाघ आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरते. पण प्रत्येकाच्या बोटाचे ठसे जसे वेगळे असतात, तसे प्रत्येक वाघाच्या शरीरावरील काळे पिवळे पट्टे वेगळे असतात. त्यामुळे कॅमेऱ्यातील फोटोंचे सूक्ष्म विश्लेषण करून फोटोतला प्रत्येक वाघ वेगळा आहे की तो एकच वाघ पाच फोटोत आहे हे 100 टक्के आता सांगता येते.

वन विभागाला आधार...
कोल्हापूर परिसरातल्या जंगलातले 160 ट्रॅप कॅमेरे अद्ययावत आहेत. त्याची जागा त्या त्या वेळच्या परिस्थितीत बदलली जाते. ज्यावेळी बिबट्या वाघाचा वावर आपल्या भागात आहे असे गावकरी सांगतात. त्यावेळी त्या भागात कॅमेरे लावले जातात. त्यातून नेमके चित्र स्पष्ट होते. त्याचा पुढच्या कार्यवाहीसाठी वन विभागाला खूप उपयोग होतो. एरवी वाघ किंवा बिबट्याचा वावर आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी खूप वेळ घालावा लागत असे. त्यात वन कर्मचाऱ्यांना दिवस-रात्र राबावे लागत असे. आता कॅमेऱ्यांमुळे हे काम सुलभ झाले आहे.
जी. गुरुप्रसाद,उपवनसंरक्षक कोल्हापूर प्रादेशिक

Advertisement
Tags :

.