प्रवासी महिलेचे दागिने चोरी प्रकरणी ; एसटी चालक अटकेत
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातील प्रकार
चोरीचे सोन्याचे दागिने जप्त, संशयितास कोठडी
कोल्हापूर
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात पोहोचलेल्या एसटीच्या ब्रेकचे काम करण्याचा बहाण्याने, प्रवाशांना खाली उतरवले. एसटी वर्कशॉपकडे घेऊन गेला असता त्याने गाडीतील प्रवाशांच्या बॅगांची तपासणी केली. यावेळी त्याने एका महिला प्रवाशाच्या पर्समधील २ लाख ५५ हजार रुपये किंमतीच्या साडेआठ तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. या प्रकरणी पोलिसांनी एस टी चालक सुधीर लक्ष्मण शिंदे (वय ४२, रा. समर्थगाव, पोस्ट अतित, जि. सातारा) याला शाहुपूरी पोलिसांनी अटक केली. त्याला मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.
ठाणे येथील संत ज्ञानेश्वरनगरातील राजश्री आनंदा नलवडे (वय 40) ही महिला राशिंग (ता. हुक्किरी, जि. बेळगाव) या गावी पुतण्याचा विवाह समारंभ असल्याने ठाणे-चंदगड या बेळगाव मार्गे असलेल्या एसटीमधून प्रवास करत होती. ही एसटी सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास कोल्हापूरातील मध्यवर्ती बसस्थानकात आली. यावेळी एसटीचा चालक सुधीर शिंदे याने एसटीच्या ब्रेकचे काम करायचे आहे, असे सांगून त्याने एसटीमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यानंतर त्याने एसटी वर्कशॉपच्या दिशेला गेला. काही वेळात तो एसटी घेऊन परत आला, यावेळी राजश्री नलवडे ही महिला प्रवाशी आपल्या जागेवर जावून बसले. त्यावेळी त्यांना सीटवर ठेवलेल्या पिशवीतील सोन्याचे दागिने लंपास झाल्याचे लक्ष्यात आले. त्यांनी एसटी थांबवून याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यावरून शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बसमधील अन्य प्रवाश्यांची व एसटीच्या चालक आणि वाहक यांची चौकशी सुरु केली.
चौकशीदरम्यान पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करीत, संशयीत चालक शिंदेने दिलेल्या माहितीमध्ये तफावत दिसून आल्याने, त्याला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने दागिने चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करून, त्याच्याकडून चोरीचे दागिने जप्त केले.