महिलेच्या मृत्यूपकरणी ट्रेलर चालकास सश्रम करावास
आंजणारी घाटात नोव्हेंबर 2023 मध्ये घडला होता अपघात
लांजा प्रतिनिधी
दोन महिलांना चिरडून त्यातील पल्लवी प्रकाश पेंढारी (47, रा. आंजणारी पेंढारीवाडी) हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ट्रेलर चालकाला लांजा न्यायालयाने सश्रम कारावासी शिक्षा ठोठावली आहे. ही घटना 23 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 8.15 वाजता मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी घाटात घडली होती.
आंजणारी पेंढारीवाडी येथील रहिवासी असलेल्या मयत पल्लवी आणि अपघातात गंभीर जखमी झालेल्या जयश्री धोंडू पेंढारी (55, रा. आंजणारी पेंढारीवाडी) या दोन्ही महिला नेहमीप्रमाणे सकाळी शेतीच्या कामासाठी चालल्या होत्या. त्या मुंबई-गोवा महामार्गावरून चालत जात असताना लखनऊ ते गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रेलरने या दोघींना धडक दिली होती. एच.आर.38 व्ही.8794 या क्रमांकाचा हा ट्रेलर सद्दाम हकीमुद्दिन अन्सारी (26, रा. तहसील वैनपूर, जिल्हा-कैमूर, बिहार) हा चालवत होता. या ट्रेलरने या दोघी पादचारी महिलांना धडक दिल्यानंतर पल्लवी पेंढारी या महिलेला चिरडले होते. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला होता. तर जयश्री पेंढारी ही गंभीर जखमी झाली होती.
या अपघातप्रकरणी लांजा न्यायालयाने ट्रेलर चालक सद्दाम अन्सारी याला दोषी ठरवत शिक्षा ठोठावली आहे. यामध्ये भा.दं.वि. कलम 304 (अ) नुसार एक महिना सश्रम कारावास, 279 नुसार 1000 रूपयांचा दंड, 337 नुसार 5 दिवस सश्रम कारावास, 338 नुसार 10 दिवस सश्रम कारावास व मोटार वाहन कायदा कलम 177 नुसार 100 रुपये दंड, दंड न भरल्यास एक दिवस साधा कारावास, दंड न भरल्यास 4 दिवस साधा कारावास, मो.वा.का.क 184 नुसार 1000 रुपयांचा दंड या प्रमाणे शिक्षा ठोठावली आहे.
दिवाणी न्यायालय लांजाचे न्यायदंडाधिकारी (वर्ग-1) पी. आर. भोसले यांनी ही शिक्षा ठोठावली. या कामी सरकारी वकील म्हणून प्रतिभा पवार यांनी काम पाहिले. लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख यांनी तपास केला. कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल उर्मिला शेडे यांनी काम पाहिले.