महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आर्यन मिश्राची शोकांतिका

06:27 AM Sep 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उत्तर प्रदेशातील फरीदाबादमध्ये गाईंचा तस्कर समजून आर्यन सियानंद मिश्रा या युवकाचा गोरक्षकांच्या टोळीने गाडीचा पाठलाग करून, गोळ्या घालून खून केल्याची घटना घडली आहे. त्याच्या मृत्यूनंतर हा युवक गो तस्कर नसल्याचे सिद्ध झाले आहे. याच गावातील गोरक्षक अनिल कौशिक याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, आपण गैरसमजातून आर्यन हा गाय तस्कर असावा असे समजून अंधारात गोळ्या झाडल्या असे तो सांगत आहे. मृत आर्यन सोबत त्याच्या वाहनातून प्रवास करणारे शेजारी या प्रकरणात आधी गो तस्करांचा पाठलाग केला म्हणून आर्यनचा खून झाल्याचे म्हणत होते. मात्र पोलीस तपासात गोरक्षक अनिल मिश्रा याचे नाव समोर आल्यानंतर मात्र ते गायब झाले आहेत. एका अर्थाने या खून प्रकरणाचा तपास भरकटवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र तथाकथित गोरक्षकांचा उत्तर प्रदेशात सुरू असणारा उच्छाद एका हिंदू युवकाचा बळी घेऊन गेला. आंधळेपणाने कायदा हातात घेऊन स्वत:च न्यायाधीश बनायला चाललेल्या झुंडीने घेतलेला हा बळी आहे. आता तरी समाजाचे डोळे उघडतील अशी आशा आहे. उत्तर प्रदेशात भल्याभल्यांना सरळ करणारे सरकार सत्तेवर आहे असे दावे वारंवार केले जातात. तिथे बंदूक घेऊन पाठलाग करत फिरणाऱ्या टोळ्या जर लोकांचा स्वत:च न्याय करत असतील तर त्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे हे म्हणणे सुद्धा धाडसाचे ठरेल. यापूर्वी गुजरातमधील एका व्यापाऱ्याचा सुद्धा असाच संशयावरून खून झाला होता. तो खून पोलीस अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने तपास करण्याच्या नावाखाली केलेल्या मारहाणीतून झाल्याचे निष्पन्न झाले होते. प्रकरण गुजरातशी संबंधित असल्याने पोलिसांच्यावर शेकले. पण आता, मृत आर्यन मिश्राच्या वडिलांना त्यांच्या मुलाचा खून करणाऱ्या गोरक्षक अनिल कौशिकला शिक्षा लागेल याबाबत शंका वाटते. तपास प्रारंभीच भरकटवणारे प्रत्यक्षदर्शी उद्या न्यायालयात आपले जबाब बदलतील आणि आरोपी निर्दोष सुटतील याची त्यांना खात्री वाटत आहे. कायदा हातात घेऊन एका युवकाच्या जीवाशी खेळलेल्या या लोकांना आपल्या कृत्याचे काहीच वाटत नाही. उलट एक हिंदू मारला गेला याबद्दल ते हळहळ व्यक्त करत आहेत. या प्रकाराने वडील हादरले आहेत. या खुनानंतर आपल्या इतर दोन मुलांचा जीव देखील धोक्यात आला असल्याची त्यांची भावना आहे. विशेष म्हणजे इतकी शोकांतिका घडूनही मिश्रा कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी राज्य शासनाचा कोणी प्रतिनिधी किंवा एखादा नेता सुद्धा फिरकलेला नाही. नाही म्हणायला कम्युनिस्ट नेत्या वृंदा करात यांनी या कुटुंबाची भेट घेऊन शासनाने तातडीने मदत करावी आणि आरोपीला शिक्षा लागण्यासाठी कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्षाला एका युवकाच्या अशा प्रकारच्या खुनाची गांभीर्याने दखल घ्यावी असे वाटले नाही. माध्यमांनी हे प्रकरण जितके दुर्लक्षित केले आहे त्यामुळे गेल्या सहा दिवसात या प्रकरणात ज्या काही घडामोडी घडल्या त्या नजीकच्या काळातच विस्मरणात जातील. दुर्दैवी आर्यनच्या खुनाचे आरोपी सहजावरी जामीनावर सुटले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. ही घटना खूपच गंभीर आहे. गोवंशाच्या रक्षणासाठी काही विधायक कार्य करावे आणि भाकड जनावरांना जगण्यासाठी देशभर एखादी चांगली व्यवस्था उभी करावी असे न करता राज्य आणि केंद्र सरकारने केवळ गोवंश हत्या बंदीचा कायदा करून ठेवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अशा भाकड जनावरांचे करायचे काय? हा प्रश्न सतावत आहे. हे भाकड जनावर मानवतेच्या दृष्टीने विचार करून जगण्यासाठी खर्च केला तर आपले जगणे मुश्किल होईल हा त्याच्या पुढचा प्रश्न आहे. तर त्याला कसायाच्या हवाली केले तर गोवंशाला धक्का पोहोचवला म्हणून बेड्या पडतीलही समस्या आहे. याचा परिणाम म्हणून उत्तर भारतातील गाय पट्ट्यात अशा भाकड गाई आणि वळू रस्त्यावरून बेवारस फिरताना मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. या बेवारस जनावरांमुळे छोट्या रस्त्यांपासून राष्ट्रीय महामार्गांपर्यंत अपघाताच्या असंख्य घटना घडत आहेत. मोकाट जनावरांच्या झुंडी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात घुसून रात्रीत सगळे पीक उद्ध्वस्त करून टाकत आहेत. त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. हाता तोंडाला आलेले पीक जनावरांनी संपवले तर जगायचे कसे आणि पुढचे वर्ष काढायचे कसे? असा प्रश्न सर्वसामान्य वर्गासमोर उभा आहे. तर गोवंशाच्या संवर्धनासाठी गाईंच्या

Advertisement

हत्येविऊद्ध कायदा केलेल्या सरकारचे ऐकायचे तर नुकसान करून घ्यावे लागते ही सध्याची स्थिती आहे. सरकारला सुद्धा त्यावर तोडगा काढणे मुश्कील बनले आहे. अशा स्थितीत दोन्ही बाजूने येणाऱ्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून जे होईल ते पाहत बसण्याशिवाय सरकारच्या हाती काही राहत नाही. या अशा बघ्याच्या भूमिकेमुळे विघ्नसंतोषी लोकांचे फावते. मग ते टोळ्या करून अशा तस्करांचा शोध घेऊ लागतात. तस्करांवर जरब बसवायची आणि आपले हेतू साध्य करून घ्यायचे किंवा सरळ बेकायदेशीररित्या बंदुकांचा वापर करून त्यांची हत्या करायची आणि समाजात आपली एक वेगळी प्रतिमा किंवा दहशत निर्माण करणे या मोकाट मानवी टोळ्यांकडून सुरू झाले आहे. त्यासाठी विशिष्ट लोकांना धर्माचे शत्रू भासवणे, त्यांच्या विरोधात सातत्याने समाज माध्यमांवर उलट सुलट लिहीत राहणे, सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे हे प्रयत्न आहेत. तात्कालीक फायद्यासाठी होणारे हे प्रकार शेवटी स्वत:चेही घर जाळतात हेच  या शोकांतिकेचे दुर्दैव आहे. गाय पट्ट्यातील हे लोण आता देशातील इतर प्रांतातही पसरत असून गाईच्या बदल्यात वासरू किंवा डोळ्याच्या बदल्यात डोळा या न्यायाने सगळे जग आंधळे होईल. त्याची प्रचिती येऊ लागली आहे. आपलीच मुले अशा ईप्रकारात बळी ठरणार नाहीत आणि गुन्हेगारही होणार नाहीत याची काळजी आता आंधळेपणाने चुकीचे विचार पसरवणाऱ्यांनी घेतली पाहिजे. जे काम कायद्याने होऊ शकते तिथे खाजगी न्यायाधीश पाठवून त्यांना गुन्हेगार बनवण्याचे थांबल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article