For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘टिश्यू कल्चर’ क्रांती

06:04 AM Jan 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘टिश्यू कल्चर’ क्रांती
Advertisement

कॉफी, काळी मिरीबरोबरच आंबा, नारळावरील प्रयोगही यशस्वी, कृषी अर्थकारणाला मिळणार चालना

Advertisement

केळी, डाळिंब, स्ट्रॉबेरी पाठोपाठ कॉफी, काळी मिरीबरोबरच आंबा व नारळाच्या ‘टिश्यू कल्चर’ पद्धतीच्या रोपांची निर्मितीही आता जैन इरिगेशनकडून करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रयोग यशस्वी झाला असून जनुकीयदृष्ट्या शुद्ध, एकसारख्या व रोगमुक्त रोपांच्या उपलब्धतेमुळे या पिकांच्या उत्पन्नवाढीलाही चालना मिळणार आहे. ‘टिश्यू कल्चर’ अर्थात ऊती संवर्धनातील या क्रांतीमुळे कृषी अर्थकारणाला नक्कीच चालना मिळू शकते.

ठिबक सिंचनाच्या पातळीवर जळगावच्या ‘जैन इरिगेशन’ने केलेले ऐतिहासिक काम सर्वश्रुतच आहे. मात्र, ‘टिश्यू कल्चर’मध्ये संस्थेने केलेल्या कामाने शेतकऱ्यांना मोठी संजीवनी मिळताना दिसत आहे. सर्वसामान्यांचे फळ म्हणून केळी या पिकाची ओळख आहे. केळीच्या या पिकाला भरभराटीचे कोंदण मिळवून देण्याचे काम संस्थेच्या शास्त्रज्ञांनी केला असून त्याला आता बराच काळ लोटला आहे. पूर्वी केळीची लागवड पारंपरिक पद्धतीने होत असे. केळीच्या कंदाचे रोपण केले जाई. मात्र, या पद्धतीत सगळीच झाडे होत नसत. 10-15 किलोच्या पुढे घड जात नसे. शिवाय घड पक्व व्हायलाही 12 ते 15 महिने लागत असत. तसेच पीकही एकाच वेळी येत नसे. मात्र, ‘टिश्यू कल्चर’मुळे बऱ्याच अडचणी दूर झाल्या आहेत. पीक एकाच वेळी तयार होऊ लागले. तसेच रोगमुक्त रोपांमुळे धोके टळले. आता दिवसेंदिवस केळीच्या ‘टिश्यू कल्चर’ रोपांची मागणी वाढताना दिसत आहे. दरवर्षी 15 कोटी इतकी केळीची रोपे निर्माण केली जातात व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली जातात. ही रोगमुक्त रोपे उत्पादन वाढीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनातही चांगली वाढ झाली आहे.

Advertisement

मागच्या काही वर्षांपूर्वी वेगवेगळ्या पिकांवर ‘टिश्यू कल्चर’चे प्रयोग करण्यात येत आहे. संस्थेच्या कृषी शास्त्रज्ञांकडून कॉफी व काळी मिरी या दोन्ही पिकांबाबतही प्रयोगशाळेत संशोधन करण्यात येत होते. प्रयोगाअंती या पिकांच्या ‘टिश्यू कल्चर’ रोप निर्मिती तंत्रज्ञान विकसित करण्यात यश आले आहे याअंतर्गत कॉफीच्या दोन प्रजाती विकसित करण्यात आल्या आहेत. चंद्रगिरी व सी आर अशी त्यांची नावे आहेत. तर पन्नीयुर1, पन्नीयुर7, पन्नीयुर8, करीमुंडा अशी काळी मिरीच्या प्रजातींची नावे आहेत. ही टिश्यूकल्चर रोपे रोगमुक्त व जनुकीयदृष्ट्या सर्वोत्तम मातृवृक्षांपासून तयार करण्यात येत आहेत. ही रोपे माती विरहित माध्यमात हरितगृहात हार्डनिंग केली जातात. रोपे मूळ संरक्षक ट्रेमध्ये वाढविली जातात. यात दोन आकारातील ट्रे मध्ये रोपे उपलब्ध करून दिली जातात. रोपांची मुळे दाट, मजबूत आणि पूर्णपणे विकसित झाल्यावर ही रोपे शेतात तसेच लागवडीसाठी लावता येतात. लागवडीनंतर योग्य छाटणी केल्यावर झाडांचा उत्तम घेर तयार होतो. मुख्य म्हणजे ही रोपे जमिनीत काही काळातच स्थिरावतात व एकसारखी वाढतात. त्यामुळे त्यांना एकाच वेळी फुले व फळधारणा होते. स्वाभाविकच भरघोस उत्पादन मिळते. कॉफीची रोपे उपलब्ध करण्यात आली असून, पुढच्या टप्प्यात काळीमिरीचीही रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यातून वातावरण बदलाशी सामना करता येईलच. शिवाय गुणवत्तावाढ करीत निर्यातक्षम उत्पादनही घेणे शक्य होईल, असे जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी सांगितले.

 फळराज आंब्यातही ‘टिश्यू कल्चर’

‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ असे संत तुकाराम महाराज म्हणतात. हाच वसा घेऊन जैन इरिगेशन एकेक पाऊल पुढे टाकत आहे. संस्थापक भवरलाल जैन यांचा ‘टिश्यू कल्चर’ तंत्राद्वारे आंब्याची रोपे तयार करण्याचा ध्यास होता. त्यांच्या हयातीत हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, कठोर मेहनत व संशोधनातून येथील शास्त्रज्ञांनी ‘टिश्यू कल्चर’ तंत्राद्वारे आंब्याची रोपं तयार करण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. जागतिक पातळीवर याबाबत संशोधन सुरू असले, तरी त्यात यश आले नव्हते. मात्र, खान्देशच्या मातीत हा प्रयोग यशस्वी होणे, हे क्रांतिकारकच म्हणावे लागेल. या तंत्राद्वारे तयार केलेल्या झाडांची फळे वजनदार तसेच आकाराने मोठी असतील. आगामी काळात शेतकरी व नर्सरीधारकांना केशर, हापूस व तत्सम जातीच्या ‘टिश्यू कल्चर’ची रोपे मिळू शकतील. संशोधन, चाचण्या, प्रयोग या सगळ्या प्रक्रियेत साधारणपणे सात ते आठ वर्षे लागतात. त्यानंतर संबंधित झाडाची रोपे आम्ही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असतो. आंब्यावरील प्रयोग यशस्वी झाले आहेत. त्यामुळे पुढच्या टप्प्यात लवकरच ही रोपे उपलब्ध करून दिली जातील, असेही अजित जैन यांनी सांगितले.

नारळालाही ‘टिश्यू कल्चर’चे कोंदण

कोकणात तसेच दक्षिण भारतात आंब्याबरोबरच नारळाचे पीकही पूर्वीपासूनच मोठ्या प्रमाणात घेतले जाते. किंबहुना, अलीकडे नारळ पीक सर्वत्रच घेतात. याच सर्वप्रिय पिकाला आता ‘टिश्यू कल्चर’चे कोंदण मिळाले आहे. आगामी काळात या झाडाची रोपेही सहजपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील. त्यामुळे कमी कालावधीत अधिकाधिक उत्पादन घेणे शेतकऱ्यांना शक्य होईल.

हवेवरील बटाटा

हवेवरील बटाटा, हे तर एक अभिनव संशोधन ठरावे. यात बटाट्याचे रोप मातीमध्ये न लावता हवेत विशिष्ट वातावरणात खुले ठेवली जाते व त्यातून बटाट्याचे पीक घेतले जाते. प्रामुख्याने हा बटाटा वेफर्सकरिता वापरला जातो.

हळद, आल्यावरही संशोधन

‘टिश्यू कल्चर’ तंत्रज्ञान वापरून केळी, डाळिंब, पेरू, पपई, स्ट्रॉबेरी, कॉफी, काळीमिरी तसेच भाजीपाल्यामध्ये टोमॅटो, ढोबळी, मिरची, काकडी, हिरवी मिरची यांची उत्तम दर्जाची, रोगविरहित व व्हायरसमुक्त रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या डाळिंबाची 1 कोटी, स्ट्रॉबेरीची 50 लाख रोपे तयार केली जातात. काळीमिरी तसेच कॉफीच्याही 20 ते 30 हजाराच्या घरात रोपांची निर्मिती होत आहे. सध्या हळद, आले या पिकांसंदर्भात संशोधन केले जात आहे. त्यामुळे ही पिकेही या तंत्राखाली येऊ शकतील.

शेतीला हवी तंत्रज्ञानाची जोड : अजित जैन

यासंदर्भात बोलताना अजित जैन म्हणाले, शेतकऱ्यांनी शेतीकडे केवळ उदरनिर्वाहाचे साधन म्हणून न पाहता व्यवसाय म्हणून पहावे. पारंपरिक शेतीमध्ये बऱ्याच अडचणी आहेत. त्यामुळे शेतीला विज्ञान तंत्रज्ञानाची जोड देणे, ही काळाची गरज असून, त्यातूनच शाश्वत विकासाच्या दिशेने पाऊल पडेल. नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा आम्ही शक्य तेवढा प्रयत्न करत आहोत. व्यावसायिक व्यवसायासाठी भांडवल उभे करतो. त्यापद्धतीने शेतकऱ्यांनीही भांडवल उभे करावे व उत्पादनखर्च वगळून स्वत:च्या गाठीशी चार पैसे कसे राहतील, हे पहावे. त्यातूनच आर्थिकदृष्ट्या त्याची शेती किफायतशीर ठरू शकते.

एकूणच ‘टिश्यू कल्चर’ वा ऊती संवर्धन तंत्रज्ञान ही कृषी क्षेत्रातील क्रांतीच म्हणावी लागेल. वेगवेगळी पिके या तंत्राखाली येऊ लागल्याने याद्वारे शेती व्यवसायातील अडचणी दूर होऊ शकतात. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होणार आहे. याचे श्रेय अहोरात्र मेहनत घेणाऱ्या जैनच्या शास्त्रज्ञांनाही द्यावे लागेल. हे संशोधन सत्र असेच सुरू रहावे व बळीराजाच्या अर्थकारणाला गती मिळावी, हीच अपेक्षा.

टिश्यू कल्चर’ म्हणजे काय?

सजीवाच्या शरीराबाहेर पोषक व निर्जंतुक माध्यमात त्याच्या पेशी वा ऊतींची वाढण्याच्या तंत्राला ‘टिश्यू कल्चर’ अर्थात ऊती संवर्धन म्हणतात. याअंतर्गत वनस्पतीच्या पेशी, ऊती, इंद्रिये किंवा इतर भाग शरीरापासून अलग केले जातात व त्यांची प्रयोगशाळेत नैसर्गिक वातावरणात वाढ केली जाते. वनस्पतीच्या क्लोनची निर्मिती करण्यासाठी याचा वापर केला जातो. ही रोपे व्हायरसमुक्त अशी असतात.

 वाढती गरज भागविण्याचा समृद्ध पर्याय

भारत हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून आता पुढे आला आहे. वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करणे, हेदेखील भारतासारख्या देशापुढचे मोठे आव्हान असेल. हरित क्रांतीमुळे भारताला आपली अन्नधान्याची गरज भागवणे शक्य झाल्याचा इतिहास सर्वांना ठाऊक आहे. मात्र, भविष्यात प्रत्येक पिकाच्या स्तरावर बदल होणे व उत्पन्न वाढणे, ही आपली गरज आहे. हे शिवधनुष्य पेलायचे असेल, तर तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही. त्यादृष्टीने टिश्यूकल्चर रोपांची निर्मिती, हा महत्त्वाचा पैलू होय. प्रयोगशाळेत तयार केलेली ही रोपे रोगग्रस्त होण्याचे प्रमाण जवळपास नसतेच. म्हणूनच या रोपांना शेतकऱ्यांकडून चांगली मागणी आहे. तथापि, अद्यापही जे शेतकरी पारंपरिक पद्धतीनेच शेती करीत आहेत, त्यांच्यापर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचविणे आवश्यक आहे. त्यातूनच खऱ्या अर्थाने शेतीमध्ये परिवर्तन घडू शकते. त्यादृष्टीने या सगळ्याला सामूहिक प्रयत्नांची जोड दिली पाहिजे. हरित क्रांती तर झालीच. आता नवक्रांतीकरिताही सज्ज रहायला हवे.

   - प्रशांत चव्हाण, पुणे

Advertisement
Tags :

.