नवीन आरटीओ कार्यालयाच्या उद्घाटनाचा अखेर मुहूर्त मिळाला
18 जुलै रोजी परिवहन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन : 9 कोटी 7 लाख रुपये खर्च
बेळगाव : संगोळ्ळी रायाण्णा चौकातील प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) नूतन कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवार दि. 18 रोजी होणार आहे. सकाळी 11.30 वा. राज्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन होईल. 9 कोटी 7 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सुसज्ज कार्यालयाचे लोकार्पण होणार आहे. बेळगाव आरटीओ कार्यालय जीर्ण झाल्यामुळे नागरिकांना अनेक समस्या येत होत्या. त्यामुळे प्रादेशिक परिवहन मंत्रालयाच्या निधीतून सुसज्ज नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात बेळगाव आरटीओ कार्यालय कॅम्प येथील बीएसएनल कार्यालयात हलविण्यात आले. 9 कोटी 7 लाख रुपये खर्चून सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे. प्रत्येक कामासाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार असल्याने नागरिकांची गैरसोय टळणार आहे.
विविध मान्यवरांची उपस्थिती
परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी एप्रिल महिन्यात कार्यालयाचे उद्घाटन होईल असे बेळगावमध्ये जाहीर केले होते. परंतु काम पूर्ण न झाल्याने अखेर जुलै महिना उजाडला. अखेर दि. 18 रोजी कार्यालयाचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाला पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार आसिफ सेठ, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, राज्य सरकारचे मुख्य प्रतोद अशोक पट्टण, कर्नाटक सरकारचे दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी, वायव्य परिवहन मंडळाचे अध्यक्ष भरमगौडा कागे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.