महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुहूर्त ठरला पण...

06:25 AM Oct 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होते की राष्ट्रपती राजवट लागते अशा सर्व चर्चा मागे पडल्या आहेत. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे आणि राज्यात निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला मतमोजणी आणि 26 तारखेअखेर नवे सरकार असा कार्यक्रम आहे. स्पष्ट बहुमत आणि जमवाजमवी 26 तारखेपर्यंत नाही झाली तर राष्ट्रपती राजवटीची टांगती तलवार आहेच. एकुणच 20 नोव्हेबरचा मुहूर्त ठरला आहे पण अद्यापी दोन्ही गोटात जागावाटप आणि उमेदवार निश्चिती झालेली नाही. वर वर महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना दिसत असला तरी या लढाईचे तपशील ठरतील. आणि करेक्ट कार्यक्रमाचे किंवा सांगली पॅटर्नचे फासे टाकले जातील तेव्हा जे रान उठेल ते वेगळेच असेल. दोन्ही आघाडीवर अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री पदाची अनेकांची इच्छा व इर्षा दडून राहिलेली नाही. ओघानेच अर्जमाघारी नंतर जे चित्र समोर येईल आणि रात्रीच्या अंधारात कोण कुणाचा हात हाती घेईल व कुणाचा कोण करेक्ट कार्यक्रम करेल याचा कुणालाच अंदाज नाही. या निवडणुकीत राजकीय विश्वासार्हता जशी अडचणीत आहे तसा जातीय सलोखाही संकटात आहे. मराठा नेते मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचा सुफडा साफ करा असा फतवा जारी केला आहे. जरांगेची आरक्षण मागणी मराठा समाजाची आणि कार्यक्रम शरद पवारांचा आहे हे राजकारण लपून राहिलेले नाही. त्यातच ‘मराठ्यांचा नाथ एकनाथ’ अशी घोषणा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून दिली जाते आहे. त्यामुळे मतपेटीतून बाहेर काय येते हे बघणे उत्कंठावर्धक ठरेल यात शंका नाही. महाराष्ट्रात दसरा मेळावे भरवायचे लोण वाढते आहे. शिवसेनेचे दोन्ही गट मुंबईत, जोडीला भगवान गडावर पंकजा मुंडे आणि नारायण गडावर मनोज जरांगे, नागपूरात सरसंघचालकाचे दसरा बौद्धिक आणि गोपीचंद पडळकरांचा दसरा मेळावा अशी चूरस होती. राज ठाकरे यांनी दसरा मुहूर्त साधून पॉडकास्ट केले. एकुणच दसऱ्याचा मुहूर्त साधून राजकीय पक्ष व नेत्यांनी आपली शक्ती दाखवली आणि निवडणुकीत आपली भूमिका काय असणार यांचा अंदाज दिला. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला फटका बसल्याने महाआघाडी आपण जिंकलोच या भावात वावरते आहे. महाआघाडीत कोण मोठा भाऊ आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरुन धुसफूस सुरु झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरे यांना हवे आहे. काँग्रेसमध्ये अनेकांनी त्यासाठी देव पाण्यात कोंडून ठेवले आहेत. तर शरद पवार आम्ही त्या शर्यतीत नाही असे सतत सांगू लागलेत. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट सावध झाला आहे. शरद पवार यावेळी कुणाचा कार्यक्रम करतात, याबद्दलही विविध तर्क आहेत पण काँग्रेसला शरद पवारांच्या विश्वासाहर्ततेचा आणि महाराष्ट्रातील पृथ्वीराज चव्हाण सरकार पाडल्याचा अनुभव आहे. दिल्लीतून उद्धव ठाकरे यांचा चेहरा पसंत आहे अशी हुल उठली आहे. मातोश्रीतील बंद खोलीतील अमित शहाचे ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन या स्वरुपातील ती आहे का हे वेळ आली तर कालांतराने कळेल पण सारे ऑलवेल नाही. महायुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक मैदानात उतरणार असली तरी महायुतीत मोठा भाऊ ही भूमिका भाजपाकडेच राहणार आहे. मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण आणि अन्य गोष्टी देऊ करुनही मराठा समाज खुश नाही. लोकसभा निवडणुकीत मराठा, मुस्लिम आणि मागासवर्गीय अशी आघाडी होऊन महाआघाडीला राज्यात अधिक जागा मिळाल्या. या साऱ्या पार्श्वभूमीवर काश्मीर आणि हरियाणा निवडणुकीत जे निकाल आले ते राज्यात दिशादर्शक ठरलेले आहेत. महायुतीने ओबीसी आणि महिला कार्ड अधिक मजबूत करण्यावर आणि महिला मते मिळवण्यावर भर दिला आहे. मागासवर्ग संविधान आणि आरक्षण धोक्यात या अपप्रचाराने लोकसभेच्यावेळी बिथरला होता. त्यालाही विश्वासात घेतले जाते आहे. ओबीसीत काही नवीन घटकांचा समावेश, ओबीसीच्या विविध घटकांचे मेळावे, त्यांच्यासाठी महामंडळे आदी पावले महायुतीने उचललीच पण गेल्या महिन्याभरात राज्याने आपली अवघी तिजोरी रिक्त करत

Advertisement

सर्वांना खुश करण्याचे धोरण अवलंबिले. मराठीला राज भाषेचा दर्जा, शेतकऱ्यांना पिकविमा व नुकसान भरपाई अथवा वाढीव हमीभावाने धान्य, सोयाबीन खरेदी असो अनेक निर्णय केले. लाडकी बहिण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले. महिलांना अर्ध्या खर्चात प्रवास, याचबरोबर मुंबईत टोलमाफी, शेतकऱ्यांना वीजबिल माफी, मनपा कामगारांना घसघशीत बोनस, मेट्रो, रेल्वे यांच्या विविध सुविधा, तीर्थयात्रा योजना, महाराष्ट्रात नवीन दहा मेडिकल कॉलेजिस, नवे वाढवण बंदर असा घोषणांचा पाऊस नव्हे ढगफुटीच केली आणि महाराष्ट्राची निवडणूक प्रतिष्ठेची करत अमित शहांनी निवडणुकीची महायुतीची सुत्रे स्वत: कडे घेतली. एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांना सोबत घेताना भाजप मोठा भाऊ, भाजप कार्यकर्त्यांनी त्याग केल्याने शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळाले वगैरे सांगत त्यांनी महायुतीला ठिकाणावर आणले व निवडणूक भाजपाच्या हातातून गेली म्हणणारे आता चूरस भरली म्हणू लागले आहेत. जागावाटप आणि उमेदवार निश्चिती वेळ खाणार आहे. वर वर दोन तंबू दिसत असले तरी आतून हातमिळवणी होणारच आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विविधरंगी लढती आणि अनपेक्षीत निकाल येणार हे सुस्पष्ट आहे. अपक्ष, बंडखोर आणि तिसरी परिवर्तन महाआघाडी, मनसे, आप, एमआयएम असे भिडू बऱ्या संख्येने निवडून आले तर मतमोजणीनंतर घोडेबाजार भरणार आणि जो तो खुर्चीला बांधील राहणार. ओघानेच बंद खोलीत काहीही ठरले तरी मैदानात कोण बाजीगर मारणार हे महत्त्वाचे आहे. त्यानंतरच चेहरा ठरेल आणि प्रत्येकजण वर्ष-सहा महिने असा काळ ठरवून सत्तेत येतील. शरद पवारांनी ठिकठिकाणी मातब्बर मराठे पक्षात घेऊन तिकीट जाहीर करायला सुरुवात केली आहे. इंदापूरमध्ये त्याला निष्ठावंतांचा विरोध झाला आहे. पण निवडून येणारा उमेदवार हाच निकष महत्त्वाचा ठरतो. जातदांडगा, धनदांडगा हे निकष राहतातच, जरांगेची साफसुफडा घोषणा काय काम करते हे बघावे लागेल. निवडणुकीपूर्वी वा नंतर निरनिराळी समीकरणे पुढे येऊ शकतात. राजकारण जोरदार आकारेल पण महाराष्ट्रहित, लोकहित यांचे भवितव्य काय होईल हे सांगता येत नाही. मतदार शहाणा असतो तो कोणाला आणि काय मुद्दा समोर ठेऊन मतदान करतो हे पहावे लागेल.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article