ऐन सणात भात कापणी, मळणी करण्याची वेळ
जास्त ओलाव्याच्या ठिकाणचे भातपीक ठेवता येणार नसल्याने शेतकऱ्यांची लगबग
वार्ताहर/धामणे
सणावरात भात पिकाच्या कापणीची सुगी करण्याची वेळ धामणे, बस्तवाड, हलगा, नंदिहळ्ळी, राजहंसगड, देसूर या भागातील सर्व शेतकऱ्यांवर आली आहे. यंदा परतीच्या पावसाने ऐन भात पिकाच्या कापणीच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे दसरा उत्सवातच दररोज मुसळधार पावसाने संततधार लावली आणि कापणीला आलेले भातपीक पाण्याखाली गेल्यामुळे भाताची सुगी लांबणीवर पडली आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये परतीच्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी धामणे, बस्तवाड, हलगा, नंदिहळ्ळी येथील शेतकऱ्यांचे भात पिकाचे शिवार काळ्या जमिनीचे आहे. त्यामुळे शिवारातील पाणी लवकरच कमी होत नाही. त्यासाठी मेढ जमिनीतील आणि माळ शिवार भागातील शेतकऱ्यांनी सुगीला सुरुवात केली आहे.
जर पावसाने आणखीन दोन तीन दिवस अशीच उघडीप दिली तर ऐन दिवाळीत भात पिकाच्या सुगीला जोर येणार आहे. दिवाळीचा सण सुगीनेच साजरा करण्याची वेळ यंदाच्या वर्षी आली असून ही सुगी करणे शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणार आहे. कारण भात कापतेवेळी पायात चिखल राहणार असून त्यामुळे भातकापणी वाकूनच करावी लागणार आहे. जास्त ओलाव्याच्या ठिकाणी आलेले भातपीक ठेवता येणार नाही. हे कललेले भात शेताच्या कडेवर ठेवावे लागणार असल्यामुळे यावर्षीची भात पिकाची सुगी या भागातील शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. मंगळवारी सकाळी 11 नंतर काही भागात ढगाळ वातावरण तयार झाल्याने या भागातील शेतकऱ्यांनी कापलेले भातपीक तातडीने बांधायला सुरुवात करून दुपारपर्यंत भात पिकाच्या गंजी तयार करून त्यावर ताडपत्री किंवा प्लास्टिक झाकण्यात आले. एकंदरीत शेतकरीवर्गाला शेतात पीक घ्यायचे झाल्यास सुखशांती व समाधान नसल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.