For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बालचमूंनी साकारलेले किल्ले दिवाळीचे मुख्य आकर्षण

10:50 AM Nov 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
बालचमूंनी साकारलेले किल्ले दिवाळीचे मुख्य आकर्षण
Advertisement

बालचमूंच्या आनंदावर पावसाचे विरजण : विविध गडकिल्ले तयार करण्यात रस, युवा वर्गही सामील

Advertisement

वार्ताहर/उचगाव

बालचमूंनी तयार केलेले मातीचे किल्ले दिवाळी सणांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. रायगड, राजगड, शिवनेरी, पन्हाळा, प्रतापगड, राजहंसगड आदी गडांच्या प्रतिकृती बाल कलाकारांच्या डोळ्यासमोर असतात. बाल कलाकाराबरोबरच युवावर्ग ही किल्ले करण्यात सहकार्य करत असल्याचे चित्र उचगाव परिसरात पहावयास मिळत आहे. गावागावात बालचमूंची फौज किल्ले निर्मितीत कार्यरत झाली आहे. मात्र या किल्ले उभारणीच्या काळात वरुणराजाची बरसात होत असल्याने  बालचमूंच्या आनंदावर पावसाचे विरजण पडले असल्याच्या प्रतिक्रिया ही मंडळी देत आहेत.

Advertisement

सहामाही परीक्षा संपल्या की, दसरा सुट्टीला प्रारंभ होतो. सहा महिन्याच्या अभ्यासाच्या तणावातून मुक्त होतात. त्यानंतर सीमोल्लंघन झाल्यावर सर्वांना दिवाळीचे वेध लागतात. या दिवाळीत कोणकोणत्या किल्ल्यांच्या प्रतिकृती करायच्या याचाच बेत आखत असतात. ऐतिहासिक किल्ल्यांची रचना करत असताना मिळणारा अनुभव अवर्णनीय असतो. ग्रामीण भागात तयार केलेल्या किल्ल्यावर नजर टाकली असता या कलाकारांच्या विविध कल्पनांची झलक पाहून आश्चर्यच वाटते. एक साधा किल्ला तयार करण्यासाठी काय काय करावे लागते. याचा बेत आखत असतात. एक वेगळ्या कलाकृतीचा आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला दिसतो. विविध प्रकारचे दगड अनेक कल्पनेने रचून त्यावर मातीच्या चिखलाचा लेप देऊन बुऊज उभे केले जातात.

आकर्षक मावळ्यांची खरेदी

शिवरायांच्यासाठी सिंहासन तर संत रामदासासाठी चंद्रमोळी झोपडीही तयार केली जाते. उतरत्या पायऱ्यावर मावळे व नागरिकांसाठी खास वेगळी जागा तयार केली जाते. वाघ, सिंह या प्राण्यांसाठी मोक्मयाच्या जागेवर गुहा काढल्या जातात. गुहाबरोबरच आकर्षक कारंजे तयार केले जातात. कारंजामुळे किल्ल्यावरील माती सतत ओली राहाते. ओल्या मातीवर हळवी, मोहरी व इतर धान्य पेरून घनदाट अरण्यही उभे केले जाते. दोन-तीन दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर तयार किल्ल्यासाठी आकर्षक मावळ्यांची खरेदी केली जाते.

मावळे खरेदीसाठी दुकानात गर्दी

दिवाळीनिमित्त खास उभ्या केलेल्या छोट्या छोट्या दुकानातून या भिडूंची मावळे खरेदीसाठी गर्दी होते. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ही मंडळी किल्ल्यांच्या कामात दंग असतात. त्यामध्ये ते तहान-भूक विसरतात. विविध मावळ्यांच्या पुन्हा पुन्हा किमती विचारून दुकानदारालाच चक्रावून सोडतात.

वर्गणीद्वारेच पैशांची जमवाजमव

दुकानदाराकडून या चित्रांची मांडणी सुबक प्रकारे केली जाते. वीस ऊपयापासून दीडशे, दोनशेपर्यंत मावळ्यांच्या प्रतिकृतींची किंमत असते. बालचमू वर्गणी काढून पैशांची जमवाजमव करतात आणि त्यातून शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, संत रामदास, जिजाबाई, गवळण, तुतारीवाले व विविध प्रकारचे विदूषक आदींची खरेदी केली जाते.

मातीपासून किल्ल्यांची प्रतिकृती बनविणे बालचमूंचा आवडता छंद

दिवाळीला मातीपासून किल्ल्यांची प्रतिकृती बनविणे हा बालचमूंचा आवडता छंद असला तरी, अनेक संघटनांनी त्यांची दखल घेतली आहे. विविध संघटना व युवक मंडळांकडून बालचमूंच्या आकर्षक किल्ला प्रतिकृतीला बक्षिसे जाहीर केली जातात. त्यामुळे बालकलाकारांचा उत्साह द्विगुणीत होऊन प्रतिकृती अधिकाधिक आकर्षक बनविण्याकडे त्यांचा कल वाढला जातो. उचगाव परिसरातील अनेक गावातून सध्या सर्व बालचमू मंडळी किल्ले बनवण्यात दंग असल्याचे चित्र दिसत आहे. एका गल्लीमध्ये दोन ते तीन किल्ल्यांची उभारणी केली जात आहे. या भागातील कल्लेहोळ या गावात युवकांकडून मोठ्या वेगवेगळ्या किल्ल्याची दरवर्षी प्रतिकृती तयार केली जाते. तुरमुरी येथे सर्वाधिक किल्ले तयार केले जातात. बाची, कोनेवाडी, अतिवाड, बेकिनकेरे, गोजगे, सुळगा (हिं.), बेनकनहळ्ळी येथे लहान मोठ्या किल्ल्यांची उभारणी केली जाते.

Advertisement
Tags :

.