आशिया कपवर विजयाचा ‘तिलक’!
फायनलमध्येही उडवला पाकचा 5 विकेट्सनी धुव्वा : तिलक वर्मा, कुलदीप यादव ठरले विजयाचे हिरो
वृत्तसंस्था/ दुबई
तिलक वर्माची तुफानी खेळी आणि कुलदीप यादवच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर आशिया कपच्या फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला लोळवत नवव्यांदा विजेतेपद पटकावले. भारताने फायनलमध्ये पाकिस्तानला 147 धावांत रोखले. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. पण त्यानंतर तिलक वर्माचा शो पहायला मिळाला. तिलक आणि शिवम दुबेने एकहाती फटकेबाजी केली आणि भारताला सामना जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. विशेष म्हणजे, आशिया चषकाच्या 41 वर्षाच्या इतिहासात दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने आले आणि त्यात भारताने बाजी मारली.
पाकने विजयासाठी दिलेल्या 148 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने अवघ्या 20 धावांवर आघाडीच्या तीन विकेट्स गमावल्या होत्या. स्पर्धेत दमदार फॉर्ममध्ये असलेला अभिषेक शर्मा अवघ्या 5 धावांवर माघारी फिरला. शुभमन गिलने दुहेरी आकडा गाठला पण 12 धावांवर त्याच्या खेळीलाही ब्रेक लागला. या दोन्ही विकेट्स फहीम अशरफने घेतल्या.
तिलक वर्माचे शानदार अर्धशतक, संजू, दुबेचीही मोलाची साथ
सूर्यकुमार यादवच्या रुपात शाहीन शाह आफ्रिदीने भारताला मोठा धक्का दिला. पण त्यानंतर तिलक वर्मा शेवटपर्यंत टिकला अन् त्याने या सामन्यात 53 चेंडूत नाबाद 69 धावांची अविस्मरणीय खेळी केली. तिलक आणि संजू सॅमसनने अर्धशतकी भागीदारी करत विजयाचा पाया रचला. संजूने 24 धावांचे योगदान दिले. त्याला अहमदने माघारी पाठवले. संजू बाद झाल्यानंतर तिलकला शिवम दुबेनी मोलाची साथ दिली. या दोघांनी पाकच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दुबेने 22 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारासह 33 धावांची खेळी साकारली. या जोरावर टीम इंडियाने 19.4 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. रिंकू सिंग 4 धावांवर नाबाद राहिला.
पाकला 146 धावांत गुंडाळले
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहान आणि फखर जमान यांनी डावाची सुरुवात केली. दुबेने सुरुवातीला टाकलेल्या दोन्ही षटकात फार धावा दिल्या नाहीत. त्याने 12 धावाच दिल्या होत्या. पण नंतर फरहानने चौथ्या षटकात जसप्रीत बुमराह विरुद्ध आक्रमक पवित्रा घेत 13 धावा वसूल केल्या. यानंतर फरहानने भारताच्या फिरकीपटूंविरुद्धही मोठे फटके मारण्याची जोखीम उचलली. फरहान आक्रमक खेळत असताना फखरने त्याला साथ दिली होती. त्यांच्यात 84 धावांची महत्वपूर्ण भागीदारीही झाली. पण अखेर वरुण चक्रवर्तीने फरहानचा मोठा अडथळा दूर केला. 10 व्या षटकात वरुणच्या गोलंदाजीवर फरहानचा झेल तिलक वर्माने घेतला. फरहानने 38 चेंडूत 57 धावांची खेळी केली.
अवघ्या 33 धावांत 9 विकेट्स
दरम्यान फरहान बाद झाल्यानंतर सॅम आयुब आणि फखर जमानने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण आयुबला 14 धावांवर कुलदीप यादवने जसप्रीत बुमराहच्या हातून झेलबाद केले. पण या विकेटसह 33 धावात पाकिस्तानने पुढच्या सर्व 9 विकेट्स गमावल्या. भारतीय फिरकीपटूंच्या भेदक माऱ्यासमोर इतर पाक फलंदाजांनी सपशेल निराशा केली. वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी डावावर पकड मिळवली. मोहम्मद हॅरिसला अक्षर पटेलने भोपळाही फोडू दिला नाही तर फखर जमान, हुसेन तलत स्वस्तात बाद झाले.
कुलदीपचे चार बळी
पाकिस्तानच्या डावातील 17 व्या षटकात कुलदीप यादव आपले अखेरचं षटक घेऊन आला. पहिल्याच चेंडूवर त्याने पाकचा कर्णधार सलमान आगाला तंबूचा रस्ता दाखवला. याच षटकात त्याने शाहीन शाह आफ्रिदी आणि फहीम अशरफ यांची विकेट घेतली. ओव्हर हॅटट्रिकसह त्याने 4 षटकात 30 धावा खर्च करत 4 विकेट्सचा डाव साधला. एवढेच नाही तर यंदाच्या हंगामातील सर्वाधिक विकेट्स मिळवण्याचा रेकॉर्डही भक्कम केला. यानंतर हॅरिस रौफला बुमराहने त्रिफळाचीत केले. बुमराहने या विकेटनंतर प्लेन क्रॅशचे सेलिब्रेशन करत रौफला चोख प्रत्युत्तर दिले. यानंतर पाकचा डाव 19.1 षटकांत 146 धावांत संपला.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान 19.1 षटकांत सर्वबाद 146 (साहिबजाद फरहान 57, फखर झमान 46, सॅम आयुब 14, कुलदीप यादव 30 धावांत 4 बळी, बुमराहृ, वरुण, अक्षर पटेल प्रत्येकी दोन बळी)
भारत 19.4 षटकांत 5 बाद 150 (अभिषेक शर्मा 5, शुभमन गिल 12, सूर्यकुमार यादव 1, तिलक वर्मा 53 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारासह नाबाद 69, संजू सॅमसन 24, शिवम दुबे 22 चेंडूत 33, रिंकू सिंग नाबाद 4, फहीम अश्रफ 3 बळी, शाहिन आफ्रिदी आणि अब्रार अहमद प्रत्येकी 1 बळी) .
फायनलमध्येही नो हँडशेक पॉलिसी कायम
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्या दोन सामन्यातील नो हँडशेक पॉलिसी कायम ठेवत पाकिस्तानी कर्णधारापासून दूरावा कायम ठेवला. सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर शास्त्राr यांनी त्याच्याशी संवाद साधला. पण सलमान आगा बोलायला आल्यावर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार यूनिस पिक्चरमध्ये आला. एका सामन्यात टॉस वेळी आपापल्या प्रेझेंटटरनं कर्णधाराची मुलाखत घेण्याची क्रिकेटच्या मैदानातील ही पहिलीच वेळ आहे. आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात पहिल्या सामन्यापासून वादाची मालिका सुरु आहे. हस्तांदोलन प्रकरण गाजल्यावरही भारतीय संघाने फायलमध्येही आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याची भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या विनंतीनुसार आशियाई क्रिकेट परिषदेने या फायनलसाठी तटस्थ सूत्रसंचालक ठेवावा, असा निर्णय घेतला होता. त्यानंतर शास्त्राr आणि वकार यांनी भारत व पाकिस्तान कर्णधारांची स्वतंत्र मुलाखत घेतल्याचे पाहायला मिळाले.
अंतिम सामन्यातून हार्दिक बाहेर
टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या या महत्त्वाच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. हार्दिकला मागील सामन्यात दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्याच्या जागी युवा फलंदाज रिंकू सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले. त्याच्या स्फोटक फलंदाजी आणि फिनिशर कौशल्यासाठी ओळखला जाणारा रिंकू या स्पर्धेतील पहिलाच सामना खेळणार आहे.