फिरकीचे ‘वाघ’ फिरकीसमोरच भुईसपाट !
भारतात येणाऱ्या प्रत्येक विदेशी संघाला धास्ती असते ती येथील चेंडू गरागरा फिरणाऱ्या खेळपट्ट्यांची नि त्याचा अचूक फायदा घेऊन दाणादाण उडविणाऱ्या फिरकी गोलंदाजांची...त्यात भारतीय फलंदाजांची ‘फिरकीचे वाघ’ अशी प्रतिमा. पण अलीकडच्या काळात सातत्यानं त्याला तडे जाऊ लागलेत. फिरकीपुढं विदेशी खेळाडूंची त्रेधातिरपीट उडतेच, पण त्यापेक्षा जास्त भंबेरी आपल्या फलंदाजांची उडताना पाहायला मिळू लागलंय. याचा आधी नमुना दाखविला तो फारसे दर्जेदार फिरकीपटू नसतानाही न्यूझीलंडनं अन् आता दक्षिण आफ्रिकेनं...
कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमानं सुनील गावस्कर यांच्या शैलीचं दर्शन घडविलं ते पुन्हा एकदा...प्रत्येक फलंदाजाचे तीन तेरा वाजविणाऱ्या त्या खेळपट्टीवर कुठलाही खेळाडू 40 धावा देखील जमवू शकला नाही. त्याला अपवाद ठरला तो फक्त पाच फूट चार इंच उंचीचा बवुमा...केपटाऊनच्या त्या 35 वर्षीय कर्णधारानं भारताच्या कुठल्याही गोलंदाजाला अक्षरश: दाद दिली नाही आणि तीन तासांमध्ये नोंद केली नाबाद 55 धावांची...
36 वर्षीय सायमन हार्मरनं 2015 पासून दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधीत्व केलंय ते फक्त 12 कसोटींत...प्रिटोरियाच्या त्या ऑफस्पिनरनं 51 धावांमध्ये यजनामांच्या आठ फलंदाजांना गुंडाळलं अन् भारताच्या फिरकी गोलंदाजांनाच खेळपट्टीकडून मदत कशा पद्धतीनं मिळवायची त्याचे छान धडे दिले. त्यानं पहिल्या कसोटीतील सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळविलेला असला, तरी दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा खराखुरा शिल्पकार होता तो बवुमाच...चेंडू भोवऱ्याप्रमाणं फिरणाऱ्या नि अचानक उसळणाऱ्या खेळपट्टीवरील त्याच्या डावाचं वर्णन करावं लागेल ते ‘मास्टर क्लास’ या शब्दांच्या साहाय्यानं...
सामना संपल्यानंतर भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले, ‘खेळपट्टी फलंदाजांसाठी अजिबात अनुकूल नव्हती असं म्हणणं साफ चुकीचं ठरेल. परंतु त्याची कल्पना भारतीय फलंदाजांऐवजी आली ती बवुमाला’...आयुष्यभर पिरकी गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर खेळत आलेले भारतीय खेळाडू नि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार यांच्यातील फरक तो कोणता ?...दोन शब्दांत उत्तर द्यायचं झाल्यास ‘संयम नि निर्धार’ !...बवुमाला अगदी 100 टक्के माहित होतं की, त्याची खरी ताकद लापलीय ती बचावात. त्यामुळं शेवटपर्यंत त्यानं भर दिला तो त्यावरच. शिवाय कसोटीची तब्बल सात सत्रं बाकी असल्यामुळं घाई करण्याची कुठलीही गरज नव्हती...
धुव्र जुरेलनं ईडन गार्डन्सवरील कसोटीच्या पूर्वी भारत ‘अ’चं प्रतिनिधीत्व करताना बेंगळूरमध्ये दोन्ही डावांत शतकं झळकावली. परंतु जेव्हा गरज भासली तेव्हा मात्र त्याचे हात-पाय गळाले. पहिल्या डावात उंची दिलेल्या चेंडूवर फसल्यानंतर दुसऱ्या डावात 33 धावांत 13 धावा काढणारा धुव्र बळी पडला तो संयमाच्या अभावी...रिषभ पंतला सुद्धा बसवावं लागेल ते त्याच रांगेत. हा अतिशय गुणी खेळाडू पुन्हा पुन्हा बाद होतोय तो संयम नसल्यानंच. चांगल्या पद्धतीच्या बचावाचं दर्शन घडवत असताना एकाएकी त्याला दुर्बुद्धी झाली ती हार्मरचा चेंडू फटकावण्याची...तर यशस्वी जैस्वाल कमी पडतोय तो सातत्याच्या बाबतीत...
गंभीरनं म्हटलंय की, भारतीय संघाला हवी होती ती अशाच पद्धतीची खेळपट्टी. पण खरं सांगायचं झाल्यास यजमान चमूतील बहुतेकांना ती अजिबात आवडली नव्हती. भारताच्या हट्टामुळं तिला पाण्याचं दर्शन घडलं नव्हतं ते तब्बल चार दिवस. या पार्श्वभूमीवर खेळपट्टीला भेगा पडण्यास प्रारंभ झाला तो दुसऱ्या दिवशीच. अपेक्षेपेक्षा ती लवकर खराब झाली आणि शिकारी आपल्याच सापळ्यात अडकला...
पूर्वी विश्लेषकांना नेहमी वाटायचं की, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना चांगल्या पद्धतीनं खेळणं जमत नाही ते फिरकी गोलंदाजांना. परंतु गेल्या काही वर्षांपासून ते खोटं ठरतंय...याउलट आपली परिस्थिती. गेल्या वर्षी न्यूझीलंडचा डावखुरे फिरकी गोलंदाज सँटनर व एजाज पटेल तसंच कामचलावू ऑफस्पिनर ग्लेन फिलिप्स यांनी तिन्ही कसोटींत भारताचा सुपडा साफ केला तो फिरकी गोलंदाजांना फार मोठी साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर...भारतानं ‘मायदेशातील वाघ’ असा किताब मिळविण्यात यश प्राप्त केलं होतं ते या खेळपट्ट्यांच्या साहाय्यानंच...अन् आता आणखी एका विदेशी संघानं फिरकी गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर यजमानांना लोळविण्याचं काम इमानेइतबारे केलंय...
पूर्वी फिरकी गोलंदाजांवर वर्चस्व गाजविणारे विश्वातील सर्वोत्तम फलंदाज या नजरेनं भारतीय खेळाडूंकडे पाहिलं जायचं. पण गेल्या काही मोसमांपासून भ्रमाचा हा भोपळा अक्षरश: फुटलाय (याबाबतीत सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड व सौरव गांगुली ही फिरकी गोलंदाजीला पिसून काढणारी शेवटची पिढी होती काय असं कुणाला वाटायला लागल्यास ते चुकीचं म्हणता येणार नाही)...तरी देखील व्यवस्थापनाचा आग्रह असतो तो चेंडू भिंगरीप्रमाणं फिरणाऱ्या खेळपट्ट्यांचा. न्यूझीलंडप्रमाणं यावेळीही अंदाज
100 टक्के चुकला...
यंदाच्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध बवुमा आणि त्याच्या साथीदारांनी चांगल्या खेळपट्ट्यांवर देखील फलंदाजांना सताविणाऱ्या नॅथन लायनला 34 षटकांत एकही बळी घेण्याची संधी दिली नव्हती, तर गेल्या महिन्यात हार्मर अन् केशव महाराज यांनी 20 पैकी तब्बल 17 बळी घशात घालून पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघाला बरोबरी साधून देण्याची मोहीम फत्ते केली...
कर्णधार शुभमन गिलच्या दुखापतीमुळं यजमान संघ दुर्दैवी ठरला हे जरी खरं असलं, तरी पराभवासाठी ते कारण मानता येणार नाही. थोडक्यात सांगायचं झाल्यास भारतीय फलंदाजांकडे फिरकी गोलंदाजांना खेळण्याचं तंत्र व संयम नि त्यांच्यावर प्रतिहल्ला करण्याचं धाडस अजिबात नव्हतं...इंडियन प्रीमियर लीगनं फलंदाजांना पाटा खेळपट्ट्यांवर षटकारांचा रतीब ओतण्याच्या कलेत तरबेज केलंय. पण खेळपट्टीनं आपला रंग बदलल्यास मात्र तेच खेळाडू अक्षरश: केविलवाणे वाटू लागतात...प्रशिक्षक गौतम गंभीरचा विश्वास आहे तो जास्तीत जास्त अष्टपैलू खेळाडूंचा संघात समावेश करण्यावर. पण एका गोष्टीची मात्र त्यांना आठवण नाही असं वाटतंय आणि ती म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक विभागात गरज असते ती त्या क्षेत्रातील तज्ञ खेळाडूंची...
भारताच्या अष्टपैलू खेळाडूंत चमकण्याची क्षमता असली, तरी कसोटीचा विचार केल्यास वॉशिंग्टन सुंदरसारख्या खेळाडूला जागतिक कीर्तीचा गोलंदाज मानून चालणं बरोबर वाटत नाही...आम्ही इंडियन प्रीमियर लीगला भारतीय क्रिकेटचा चालक व संचालक बनविलंय अन् तिथं शोधतोय कसोटी क्रिकेटसाठीचे खेळाडू. ‘आयपीएल’नं भारतीय संघाला मर्यादित षटकांच्या सामन्यांत अव्वल बनविलेलं असलं, तरी सातत्यानं नुकसान होतंय ते कसोटी क्रिकेटचं. भारतानं एकदिवसीय सामन्यांत नि टी-20 मध्ये पहिला क्रमांक मिळविलेला असला, तरी कसोटीच्या यादीत आपण घसरलोय चौथ्या स्थानावर...ईडन गार्डन्सवर सामना चालू असताना सुद्धा काही समालोचकांमध्ये चर्चा रंगली होती ती इंडियन प्रीमियर लीगमधील व्यवहारांची. हे एकच उदाहरण पुरेसं...
वर्ष 1987...बेंगळूरची फिरकी गोलंदाजांचा उत्साह प्रचंड वाढविणारी खेळपट्टी...भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना...एक सर्वकालीन महान सलामीचा फलंदाज खेळत होता कसोटी कारकिर्दीतील त्याचा शेवटचा डाव...37 वर्षांच्या त्या फलंदाजानं 264 चेंडूंना तोंड दिलं आणि 320 मिनिटं खेळपट्टीवर नांगर घालून अप्रतिम बचावाचं दर्शन घडविलं...इक्बाल कासिम नि तौसिफ अहमदसारखे दिग्गज पाक फिरकी गोलंदाज देखील त्याच्यापुढं हतबल झाले. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या कालावधीतील तो सर्वोत्तम सलामीचा फलंदाज अखेर 96 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला अन् भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं ते अवघ्या 16 धावांनी...सध्या गरज आहे ती त्या सुनील मनोहर गावस्करांसारख्या महामानवाची. गावस्कर यांच्या त्या खेळीकडे कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट शेवटच्या डावांपैकी एक म्हणून पाहिलं जातंय!

- राजू प्रभू